आपत्कालीन सेवाही राहणार पूर्णपणे बंद
कल्याण दि.17 सप्टेंबर :
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक जारी करून सीसीएमपी (CCMP) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) च्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयाचा भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) महाराष्ट्र राज्याने तीव्र विरोध दर्शविला असून उद्या गुरुवारी 18 सप्टेंबर 2025 रोजी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे. (IMA to hold state-level strike on Thursday, September 18 against MMC registration of doctors holding CCMP course)l
आयएमएने स्पष्ट केले की, हे डॉक्टर आधीच महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत. शासनाने घेतलेला हा निर्णय ११ जुलै २०२४ रोजीच्या स्वतःच्या परिपत्रकाच्या विरोधात असून, यासंदर्भातील खटला माननीय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना काढलेले हे परिपत्रक कायद्याला धरून नसलेले व न्यायालयाचा अवमान करणारे आहे.
या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होईल, आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा तसेच व्यवसायाचा दर्जा घसरेल. तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल, अशी भूमिका आयएमएने मांडली आहे. तर अपुरे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार म्हणजे थेट त्यांच्या जीवाशी खेळ असल्याची भीतीही आयएमएकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर २०२५ चे परिपत्रक तात्काळ रद्दबातल करावे, माननीय उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचे पावित्र्य राखत रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशा मागण्या आय एम एकडून करण्यात आल्या आहेत.
तर यासंदर्भात गुरुवारी १८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यभरातील सर्व डॉक्टर एक दिवसाचा टोकन संप (Complete Shutdown) करतील. ज्यामध्ये आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली आहे. तसेच शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा आणि बेमुदत उपोषणही छेडण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.
तर हा लढा डॉक्टरांचा नसून, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि वैद्यकीय व्यवसायाच्या सन्मानासाठी आम्ही लढत असल्याचेही आयएमएने स्पष्ट केले आहे.