Home ठळक बातम्या भुमीपुत्रांवर अन्याय झाल्यास थेट महापालिकेतच आंदोलन; आगरी सेनेचा केडीएमसी प्रशासनाला इशारा

भुमीपुत्रांवर अन्याय झाल्यास थेट महापालिकेतच आंदोलन; आगरी सेनेचा केडीएमसी प्रशासनाला इशारा

 

कल्याण दि.१४ ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कल्याण पश्चिमेच्या गौरीपाडा परिसरात उद्यानासाठी भूमीपुत्रांची जागा मोठ्या प्रमाणात बाधित होत आहे. मात्र यामध्ये भूमी पुत्रांवर अन्याय झाला तर थेट महापालिका मुख्यालयातच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आगरी सेनेतर्फे देण्यात आला आहे. या प्रश्नासंदर्भात आगरी सेनेतर्फे नुकतीच केडीएमसीच्या नगर रचना विभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये हा इशारा देण्यात आला.

कल्याण पश्चिमेच्या गौरीपाडा परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत उद्यानासाठी भूमीपुत्रांची जागा मोठ्या प्रमाणात बाधित होत आहे. मात्र महापालिका प्रशासन बाधितांना अत्यंत कवडीमोल दराने मोबदला देऊन या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचे आगरी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाणकर यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही आगरी सेनेच्या माध्यामातून महापालिकेमध्ये नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. आणि या प्रकल्पात भूमीपुत्रांवर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. अन्यथा आम्ही त्याविरोधात थेट महापालिका मुख्यालयातच आंदोलन करू असा संतप्त इशारा ठाणकर यांनी यावेळी प्रशासनाला दिला.

या चर्चेदरम्यान आगरी सेना कल्याण शहराध्यक्ष महेश केणे, शहर महिला आघाडी अध्यक्षा रेखा तरे यांच्यासह गौरीपाडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा