डोंबिवलीतील एमआयडीसी विभागातील सर्व रस्त्यांसाठी 110 कोटी मंजूर
डोंबिवली दि.2 जून :
कल्याण डोंबिवली परिसरात चहूबाजूंनी विकासाची कामे सुरू असून येत्या वर्षभरात इथली वाहतुकीची समस्या दूर होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी विभागातील सर्व रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या 110 कोटी रुपयांच्या निधींबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (In the coming year, the issue of transport in Kalyan Dombivali has been resolved – MP Dr. Shrikant Shinde)
कल्याणमध्ये नुकतेच दुर्गाडीच्या 2 लेनचे लोकार्पण झाले असून उर्वरित पूलाचे काम लवकरच केले जाईल, पत्रीपुलाचे कामही काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. कल्याण शिळ मार्गावरील उड्डाणपूलही काम प्रगती पथावर आहे, डोंबिवलीतील मोठागाव माणकोली उड्डाणपूलही काही महिन्यात पूर्ण होईल तर रिंगरोडचे कामही येत्या वर्षभरात पूर्ण होईल. त्यामूळे येत्या वर्षभरात कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
एमआयडीसीच्या औद्योगिक आणि निवासी विभागातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार..
तर गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या एमआयडीसी परिसरातील 35 रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार असल्याने इथली रस्त्यांच्या दुरवस्थेची समस्या कायमस्वरूपी दूर होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या रस्त्यांच्या कामासाठी एमआयडीसीकडून 57 आणि एमएमआरडीएकडून 53 असा तब्बल 110 कोटीचा निधी आपण मंजूर करण्यात यशस्वी झालो आहोत. केडीएमसी आणि एमआयडीसी या दोन्ही शासकीय संस्था लवकरच या रस्त्यांच्या कामाचे टेंडर काढतील आणि त्यांचे काम सुरू होईल. तोपर्यंत इथल्या रस्त्यांची केडीएमसी प्रशासनामार्फत डागडुजी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेना श्रेयवादात पडत नाही जे काम करतो ते छाती ठोकपणे सांगतो…
आम्ही केवळ घोषणाबाजी करत नाही की श्रेयवादात पडत नाही. जे काम आम्ही करतो ते छाती ठोकपणे सांगत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विकास हेच ध्येय समोर ठेवून काम करत असल्याने इतके वर्ष कल्याण डोंबिवलीकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. आपण काय करतो किंवा बाकी कोण काय करतं यापेक्षा माझे काम काय? मला लोकांनी कशाला निवडून दिले आहे या विकासाच्या दृष्टीने आपण काम।करत असल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.