Home कोरोना मोबाईलविना विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून कल्याणातील मराठी शाळेचा असाही पुढाकार

मोबाईलविना विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून कल्याणातील मराठी शाळेचा असाही पुढाकार

 

कल्याण दि.13 ऑगस्ट :
शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याचे प्रकार घडत असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून कल्याणातील बालक मंदिर या मराठी शाळेने घेतलेल्या पुढाकाराचे मोठे कौतुक होत आहे. मोबाईलविना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून देत बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेने शैक्षणिक क्षेत्रात नविन आदर्श निर्माण केला आहे.

आजच्या इंग्रजीच्या रेट्यातही मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या निवडक शाळांमध्ये बालक मंदिर संस्थेचाही समावेश आहे. परंतु कोरोना आला आणि शिक्षण क्षेत्राचे संपूर्ण चित्रच बदलले नाही तर ढवळून निघाले. इतर क्षेत्रांप्रमाणे मग ऑनलाईनच्या माध्यमातून शाळा सुरू झाल्या. मात्र काही विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही असे विद्यार्थी मोबाईलविना शिक्षणापासून वंचित होते. ही बाब बालक मंदिर शाळेच्या निदर्शनास आल्यावर मग शाळेने जुने स्मार्टफोन देण्यासह आर्थिक मदतीचे आवाहन केले.

आणि मग शाळेच्या अनेक माजी विद्यार्थी, हितचिंतक यांच्यासह अनेक जणांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही उणीव भरून काढली. या सर्वांच्या मदतीतून जमा झालेल्या निधीतून मग शाळेने तब्बल 35 नवे कोरे मोबाईल गरजू विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केले आणि मग शिक्षकांसह पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर मोबाईल मिळाल्यामुळे आपल्यालाही आता ऑनलाईन शाळेमध्ये सहभागी होता येणार असल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसत होता. शिक्षणापासून वंचित असणारा आमचा विद्यार्थी त्यापासून दूर जाऊन त्याचे नुकसान होऊ नये म्हणून शाळेने हा पुढाकार घेऊन उपक्रम राबवल्याची माहिती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांनी दिली.

 

बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात झालेल्या या हृदयस्पर्शी कार्यक्रमाला केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जे.जे.तडवी, युवा अन स्टॉपेबल संस्थेचे समन्वयक राजेश पुरोहित, शालेय समिती अध्यक्ष रमेश गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका कल्पना पवार, संस्था पदाधिकारी प्रसाद मराठे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा