कल्याण दि.9 मार्च :
के. एम. अग्रवाल महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान), कल्याणच्या वतीने ९ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कल्याण शहरातील विविध प्रभागांमधील महिला नगरसेविकांचा गौरव करण्यात आला. (International Women’s Day Celebrated with Enthusiasm at K. M. Agrawal College, Kalyan; Newly Elected Women Corporators Felicitated)
यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका शालिनी वायले, अनघा देवळेकर, डॉ. तनुजा वायले, प्रमिला भगवान पाटील, स्वप्नाली विनोद केणे, पोटे विजया अरविंद, कांचन कुलकर्णी, मेघाली सचिन खेमा, माया देवानंद कांबळे, अपर्णा संतोष भोईर आणि दर्शना समीप काळे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या ट्रस्टी श्रीमती रसिका गवळी, श्वेता पांडेय तसेच महाविद्यालयातील प्राध्यापिकांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता मन्ना होत्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांनी शिक्षण, सामाजिक कार्य आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी महिलांचा सन्मान राखत समाजात समानता आणि संवेदनशीलतेची जाणीव निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपप्राचार्या डॉ. अनघा राणे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांच्या नेतृत्वामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचेही नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला नगरसेविकांनी आपल्या कार्याचा अनुभव, समाजातील विविध आव्हाने तसेच महिला नेतृत्वाच्या प्रवासाबाबत मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थिनींना समाजकार्य, नेतृत्व आणि जबाबदार नागरिकत्व यासाठी प्रेरित केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

