महात्मा फुले आणि कल्याण वाहतूक पोलिसांच्या पथकाने लावला छडा
कल्याण दि.18 डिसेंबर :
अंमली पदार्थ विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांच्या परिमंडळ 3 कल्याणच्या पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. गांजा तस्करीप्रकरणी महात्मा फुले पोलीस आणि कल्याण वाहतूक पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीचा छडा लावत त्यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, यातील 14 पैकी 8 सराईत आरोपींना गजाआड असून आणखी 6 आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे मकोकाअंतर्गत करण्यात आलेली ही दुसरी कारवाई असल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Interstate Drug Trafficking Racket Busted by Kalyan Police; 8 Accused Arrested with 35 kg of Ganja)
बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ऑगस्ट महिन्यात महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि कल्याण शहर वाहतूक पोलिसांकडून कल्याण पश्चिमेच्या बळीराम सिंग परदेशी आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यावेळी संशयास्पदरित्या आलेली छत्तीसगड 08 एएम 9401 क्रमांकाच्या बालेनो कार पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण कारचालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगात पुढे निघून गेले. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या पथकाने काही अंतरावर पुढे जाऊन ही गाडी अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 35 किलो गांजा आणि एक गावठी पिस्तूल आढळून आल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.
तर या गाडीतील मोहम्मद सरफराज मोहम्मद आसिफ याच्यासह मोहम्मद रफीक शेख, फैजान शेख, समीर अली, आसिफ सय्यद या 5 जणांना अटक केली. त्यांच्या झालेल्या चौकशीत शाहीद अब्दुलगनी शेख, शाहीद शेख आणि रवींद्र मिर्धा या आरोपींना भिवंडी – नागपूर आणि ओडिसा राज्यातील आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपींचा कसून शोध घेण्यात येत असून या 14 जणांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व टोळी नागपूर, अमरावती, भंडारा तसेच ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीसाठी सक्रिय असल्याचे तसेच त्यांच्यावर नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत 40 पेक्षा गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बळीराम सिंग परदेशी, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस निरीक्षक विजय नाईक, उपनिरीक्षक विकास मडके, संतोष चौधरी, हवालदार महेंद्र मंझा, थेरे आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद झोडगे, शिपाई सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

