Home ठळक बातम्या येत्या रविवारी मलंग गडावर घुमणार ‘जय मलंग श्री मलंग’चा जयघोष

येत्या रविवारी मलंग गडावर घुमणार ‘जय मलंग श्री मलंग’चा जयघोष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत श्री मलंग गडावर होणार आरती

कल्याण दि.२ फेब्रुवारी :
येत्या रविवारी असणाऱ्या माघ पौर्णिमेनिमित्त कल्याणजवळील श्री मलंग गडावर दरवर्षीप्रमाणे धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत मलंग गडावर पूजा आणि आरती केली जाणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमूख गोपाळ लांडगे यांनी दिली.

मलंगगडावर दरवर्षीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी, दिनेश देशमुख, कल्याण शहर प्रमूख रवी पाटील, डोंबिवली शहर प्रमूख राजेश मोरे, उल्हासनगर शहर प्रमूख राजेंद्र सिंह भूल्लर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने धर्मवीर आनंद दिघे यांनी १९८० च्या दशकापासून हा मलंगगड उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. आणि आज तीन दशकांनंतरही हा उत्सव अव्याहतपणे सुरूच असून त्यामध्ये शिवसेनेसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा, हिंदू मंच यांसारख्या इतर अनेक संघटनाही सहभागी होत असल्याचे गोपाळ लांडगे यांनी सांगितले. एकीकडे या उत्सवाच्या माध्यमातून मलंग गडावरील हिंदूंची वहिवाट कायम राखली जात असताना दुसरीकडे न्यायालयातही त्यासाठी कायदेशीर लढा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तर येत्या रविवारी असणाऱ्या या उत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सकाळी साडे अकराच्या सुमारास मलंग गडावर आरती आणि पूजेसाठी येणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. तर त्यासोबतच असंख्य शिवसैनिक आणि हिंदू प्रेमी संघटनांचे असंख्य कार्यकर्तेही मलंगगड उत्सवाला उपस्थित राहणार आहेत. तसेच कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील असंख्य शिवसैनिकही या यात्रेला येणार असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा