Home ठळक बातम्या कल्याण स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर ट्रॅफिक पोलीस आणि आरटीओची संयुक्त कारवाई

कल्याण स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर ट्रॅफिक पोलीस आणि आरटीओची संयुक्त कारवाई

 

कल्याण दि.14 डिसेंबर :
कल्याण स्टेशन परिसरात आधीच स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावलेला असतानाच बेशिस्त रिक्षा चालकांमुळे त्यात अजून भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण ट्रॅफिक पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी आज सकाळी कल्याण स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली.

स्मार्ट सिटीचे काम सुरू होण्यापूर्वीही कल्याण स्टेशन परिसर शेकडो रिक्षांनी गजबजलेला असायचा. उभ्या -आडव्या कशाही पध्दतीने लावलेल्या रिक्षांमुळे इतर वाहनांना अडथळा तर व्हायचाच मात्र नागरिकांचीही रिक्षांच्या गर्दीतून वाट काढताना दमछाक व्हायची. त्यातच गेल्या काही महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांमूळे वाहतूक कोंडीत भर पडण्यासह नागरिकांनाही स्टेशनवरून बाहेर पडण्यास आणि स्टेशनवर जाण्यास अडथळा येत होता. त्याबाबतच्या अनेक तक्रारी आल्याने कल्याण शहर वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कारवाई केली.

यावेळी स्टेशन परिसरातील सुमारे 800 ते 1 हजार रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. कल्याण आरटीओकडून 41 आणि वाहतूक पोलिसांकडून 44 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून आरटीओचे सुधारित नियम लागू करण्यात आले असून त्यात पूर्वीपेक्षा अधिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबतही नागरिक आणि वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहनही तरडे यांनी यावेळी केले आहे.

मागील लेखसुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे साधणार कल्याणातील 10 वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 11 रुग्ण तर 18 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा