Home बातम्या शब्द वापरताना पत्रकारांनी समाजभान राखण्याची गरज – दुर्गेश सोनार

शब्द वापरताना पत्रकारांनी समाजभान राखण्याची गरज – दुर्गेश सोनार

कल्याण दि. 6 जानेवारी :
पत्रकार नेहमी शब्दांच्या दुनियेत वावरत असतात,लेखनात नेहमी निरनिराळ्या शब्दांचा वापर केला जातो. हे शब्द कसे वापरतो, कोणते वापरतो यावर त्या पत्रकाराच्या लेखनाचा तसेच वृत्तपत्राच्या साहित्याचा दर्जा अवलंबून असतो. आकाशवाणी ,दूरदर्शन, खाजगी वाहिन्या यामुळे मराठीला खूप चांगले दिवस आले आहेत. आज प्रसारमाध्यमे बदलली पण शब्दांचे स्वरूप तेच राहिले. त्यामुळे शब्द वापरताना आपण समाजभान राखतो का? याचे पत्रकारांनी आत्मचिंतन केले पाहिजे असा सल्ला देत पत्रकारांच्या हक्काच्या घरासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष घालून वाजवी दरात पत्रकारांना घर मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत असे मत लोकमतचे सहाय्यक संपादक दुर्गेश सोनार यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून कल्याण प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रेस क्लबचे अध्यक्ष आनंद मोरे, सचिव विष्णूकुमार चौधरी यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते.

सत्य काय आहे हे दाखवणे पत्रकाराचे प्रथम कर्तव्य आहे. प्रत्येकाचा समाजातील चेहरा वेगळा असतो, घरातील चेहरा वेगळा असतो. पत्रकारांनी वाचन वाढवले पाहिजे. त्यापासून त्यांची शब्दसंपदा वाढते. शब्दांमध्ये अफाट ताकद असते, त्या ताकदीच्या जोरावर त्यांनी समाजपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याची आज आवश्यकता असल्याचे दुर्गेश सोनार यांनी सांगितले.

तर पत्रकाराचं हक्काचे घर असणे महत्वाचे असून त्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यावर पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले आहेत. याबाबत आपला सतत पाठपुरावा सुरु असून आपल्या कारकिर्दीत पत्रकारांना स्वतःचे घर मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. पत्रकारांना अनेक अडचणीतून जावे लागते, त्यामानाने त्यांना कामाचा मोबदला मिळत नाही. शासनाने दिलेल्या सवलती पत्रकारापर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी पत्रकारांनी एक होऊन संघटितपणे काम करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकार, शहरातील प्रतिष्ठित पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच प्रेस क्लबमधील जेष्ठ पत्रकार नवीनभाई भानुशाली आणि प्रमोद भानुशाली यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून केलेल्या कामाबद्दल त्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्याचा आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा