कल्याण | 9 मे :
कल्याण येथील श्रीमती कांताबेन चंदुलाल गांधी म्हणजेच के.सी. गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेतील उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा शाळेतील सर्वच्या सर्व २६९ विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती संस्थेचे सचिव मनोहर पालन यांनी दिली आहे. (K.C. Gandhi School Continues Its Tradition of 100% SSC Results; Samanyu Vartak Tops the School with 99.20% Marks)
यंदाच्या निकालात मास्टर सामन्यू चंदन वर्तक याने ९९.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर विग्नेश श्रीनिवास पै याने ९८.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. स्वामिनी सतीश वाळुंज, तनिष्का प्रसाद उपाध्ये आणि हर्ष सतीशकुमार वर्मा या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९७.८० टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले.
विशेष बाब म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा गौरव वाढवला आहे. अथर्व अविनाश पाटील याने ८२.६० टक्के तर सुप्रिया गणेश उमप हिने ८१.६० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेच्या एकूण निकालानुसार:
* ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी – ७६
* ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी – ९७
* ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी – ३५
* ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी – ५६
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

