Home क्राइम वॉच वृद्ध महिलांना लुटणाऱ्या गुन्हेगाराच्या अँटी रॉबरी स्कॉडने आवळल्या मुसक्या

वृद्ध महिलांना लुटणाऱ्या गुन्हेगाराच्या अँटी रॉबरी स्कॉडने आवळल्या मुसक्या

कल्याण दि.2 फेब्रुवारी :
भांडी पॉलिश करण्याच्या बहाण्याने घरात शिरून वृद्ध महिलांना लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कल्याण अँटी रॉबरी स्कॉडने अटक केली आहे. विनोदप्रसाद मुकेशप्रसाद साह असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ पोलीस ठाण्यात 7 गुन्हे दाखल आहेत.

घरामध्ये एकट्या असणाऱ्या वृद्ध महिलांना हेरायचे आणि घरातील पितळ्याची भांडी पॉलिश करण्याच्या बहाण्याने विनोदप्रसाद घरात शिरायचा. पावडरच्या सहाय्याने घरातील भांडी पॉलिश करून दिल्यानंतर मग तो संबंधित महिलांकडे सोन्याचे दागिने पॉलिशसाठी मागणी करायचा. त्यानंतर एक भांड्यात पाणी, हळद आणि पावडर एकत्र घेऊन त्यात दागिने टाकायचा. त्यानंतर हातचलाखीने महिलांचे नजर चुकवून त्यातून दागिने काढून ते भांडे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवण्यास सांगायचा आणि तिकडून पळ काढायचा अशी त्याची कार्यपद्धती होती अशी माहिती स्कॉडचे निरीक्षक एस.एन. देशमुख आणि उपनिरीक्षक ए.के.पाळदे यांनी दिली. तर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, भायखळा परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यातील 65 ग्रॅम वजनाचे दागिने आणि 30 हजार रुपये रोख असा सव्वादोन लाखांचा ऐवज अँटी रॉबरी स्कॉडने हस्तगत केला आहे. तसेच या गुन्ह्यातील इतर 3 साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहेत.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.एन.देशमुख, उपनिरीक्षक ए.के.पाळदे, पोलीस नाईक सुनिल पवार, अनुप कामत, नरेंद्र बागुल, भिमराव बागुल, अनिल पाटील, अमोल गोरे, उपेश सावळे, विलास कडू, चिंतामण काकडे, पोलीस हवालदार सुनिल गावित आदी पथक करीत आहे. सीसीटीव्ही फुटेजसह इतर तांत्रिक पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करून या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*