भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाउंडेशनतर्फे कार्यक्रमाआयोजन
कल्याण दि.22 ऑक्टोबर:
प्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या अद्भूत सूरांमध्ये उजळलेली दिवाळी पहाट हजारो कल्याणकरांनी आज अनुभवली. भगवान शिवशंकराच्या गीतांबरोबरच कैलास खेर यांनी सादर केलेल्या मनमोहक आणि अविस्मरणीय गीतांचा गोडवा अनुभवत कल्याणकरांनी एकमेकांना बलिप्रतिपदा – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. कैलास खेर यांच्या सूरांच्या अनुभूतीबरोबरच प्रसिद्ध कलाकार सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांची मिमिक्रीही हास्याचा स्फोट घडवून गेली.
भारतीय जनता पार्टी आणि `कपिल पाटील फाउंडेशन’च्या वतीने कल्याण पश्चिम शहरातील खडकपाडा साई चौक येथे दरवर्षी दिवाळी पहाट आयोजित केली जाते. या ठिकाणी होणारी दिवाळी पहाट ही गेल्या ९ वर्षांपासून कल्याणकरांची सांस्कृतिक परंपरा झाली आहे. यंदाही या परंपरेनुसार गायक कैलास खेर, सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांनी प्रसन्न, पवित्र वातावरणात आध्यात्मिक, पारंपरिक संगीताबरोबरच विनोदी किस्स्यांनी रसिकांची मने धूंद केली.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथराव पाटील, आमदार सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, प्रेमनाथ म्हात्रे, वरुण पाटील, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
जगभरातील रसिकांच्या पसंतीला उतरलेली गाणी कैलास खेर यांनी सादर केली. मै दिवाना हो गया, तू जाने ना, रंग दी नी, दिल मेंरा ढोलना, मेरी दिवानी, या रब्बा, टूटा टूटा परिंदा, सैय्या सैय्या आदींसह अनेक गीतांमध्ये रसिक हरवून घेतले. काही गीतांवर रसिकांनी ठेका धरला. तर शिवशंकराच्या जयजयकाराच्या आराधना गीताने वातावरण भक्तिमय झाले होते. सुगंधा मिश्रा यांनी काही गीतांबरोबरच गानसम्राज्ञी लता मंगेशकर, फराह खान यांची मिमिक्री केली. तर मूळ कल्याणकर असलेल्या डॉ. संकेत भोसले यांनी काढलेले अभिनेता संजय दत्त, सलमान खान, सयाजी शिंदे यांच्या आवाजाला टाळ्यांच्या कडकडाटात नागरिकांनी पसंती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या शिंका, अभिनेत्यांच्या कुत्र्यांच्या आवाजाही मिमिक्री संकेत भोसले यांनी केली.
साई चौकात दरवर्षी होणारी `दिवाळी पहाट’ हा पारंपरिक सोहळा झाला आहे. या कार्यक्रमावर हजारो कल्याणकर रसिकांचे प्रेम आहे. रसिकांचे प्रेम असेपर्यंत, कल्याण शहराचा हा पारंपरिक सोहळा दरवर्षी नागरिकांना अनुभवता येईल, अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. तसेच हजारो कल्याणकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी कल्याणचा तरुण राज मिसाळ याच्या प्रदर्शित होणाऱ्या ऊत चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. अखेर जय जय महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. रेश्मा रमेश यांनी सूत्रसंचालन केले.
कल्याण ही देवभूमी, तपोभूमीची मनात जाणीव : कैलास खेर
माझ्या आयुष्यात हजारो नागरिकांच्या गर्दीत होणारी ही पहिलीच दिवाळी पहाट आहे. कल्याणच्या भूमीत आल्यानंतर देवभूमी, तपोभूमी आणि वरदानप्राप्त भूमीत आल्याची जाणीव होत आहे, अशा शब्दांत गायक कैलास खेर यांनी भावना व्यक्त केली. पवित्र काशीत माझी आणि कपिल पाटील यांची पहिली भेट झाल्यानंतर आम्हा दोघा शिवभक्तांमध्ये निर्माण झालेल्या स्नेहातून आजचा कार्यक्रम होत आहे, असे कैलास खेर यांनी सांगितले.