कल्याण दि.12 एप्रिल :
शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक करत त्याच्याकडून ₹३.५५ लाख किंमतीच्या १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमध्ये विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ८ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. (Kalyan Crime Update | Habitual Vehicle Thief Arrested; 10 Two-Wheelers Worth ₹3.55 Lakh Seized)
🔍 संशयावरून कारवाई; आरोपी जाळ्यात
३ एप्रिल २०२६ रोजी पोलीस हवालदार सुरेंद्र इंगळे यांना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या वाहनांची पाहणी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी शिताफीने शुभम उर्फ शिवम संपत पाठारेसह त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. शुभमच्या करण्यात आलेल्या पोलीस चौकशीत तो वाहन चोरीतील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
🏍️ चोरीची कबुली; अनेक गुन्हे उघड
या आरोपीने विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक तसेच उल्हासनगर परिसरातून दुचाकी चोरी केल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले असून पोलिसांनी त्याच्याकडून एक्सेस १२५ (MH05/EN-5871) सह चोरीच्या गुन्ह्यांतील १० दुचाकीही जप्त केल्या.
३.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जप्त करण्यात आलेल्या या वाहनांची एकूण किंमत सुमारे ₹३,५५,००० इतकी असून, या कारवाईमध्ये कोळसेवाडी पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव, उपनिरीक्षक जगन सापटे, पोलीस हवालदार कापडी, बोरसे, सांगळे, सौंदाणे, वाघ, घुगे, आव्हाड, जाधव, बुधवंत, पोलीस नाईक फटांगरे, कोती, पोलीस शिपाई इंगळे, खरे, सोनावळे आणि गीते या पथकाने केली आहे.
⚠️ नागरिकांना आवाहन
वाहन मालकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

