नविन वर्षामध्ये नागरिकांना मिळणार चकाचक शहर
कल्याण, दि. 27 ऑक्टोबर :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहराचे सौंदर्य आणि स्वच्छता वाढवण्यासाठी एक व्यापक “शहर सुंदर अभियान” सुरू केले आहे. या अंतर्गत शहरातील मुख्य रस्ते, डिव्हायडर, उद्याने, खेळाची मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांची रंगरंगोटी, दुरुस्ती आणि सजावट केली जात आहे. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण होत आहे. हा उपक्रम केवळ सौंदर्यवर्धनापुरता मर्यादित नसून, नागरिकांना आरामदायी आणि स्वच्छ सार्वजनिक वातावरण मिळावे, हा त्यामागचा उद्देश असल्याची माहिती मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे. “सध्या या कामांचा अंदाजे २५ टक्के भाग पूर्ण झाला आहे. उर्वरित काम गतीने सुरू असून, नवीन वर्षापूर्वी शहराला नव्या आकर्षक रुपात सादर करण्याचा प्रयत्न आहे.” विशेष म्हणजे रस्त्यांवरील डिव्हायडरची रंगरंगोटी ही शहरातील विकासकांच्या मार्फत केली जात असून पालिकेला त्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.
उपक्रमाची वैशिष्ट्ये:
– शहरातील प्रमुख रस्त्यांवरील डिव्हायडरची पुन्हा रंगरंगोटी आणि वनस्पती सजावट
– उद्यानांतील बाक, खेळणी, व्यायाम साधनांची दुरुस्ती*
– मैदानांच्या आजूबाजूचा कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहीम
– सार्वजनिक भिंतींवर भित्तीचित्रांच्या माध्यमातून सामाजिक संदेश
दिवाळीतच हा उपक्रम राबवण्याचा पालिकेचा मानस होता. मात्र सततच्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात विलंब झाला. तरीही, प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड न करता गती कायम ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर रंगीत डिव्हायडर, आकर्षक उद्याने आणि सुशोभित मैदानांनी नवीन झळाळी आणली आहे. या उपक्रमामुळे शहराच्या सौंदर्यात भर तर पडेलच, पण नागरिकांच्या जीवनमानातही सुधारणा होईल, असा विश्वासही मुख्य उद्यान अधीक्षक जाधव यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेचा हा प्रयत्न “स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक कल्याण-डोंबिवली”च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मात्र त्यासाठी शहरातील नागरिकांनीही त्यामध्ये आपले योगदान दिल्यास शहर स्वच्छ होण्यास आणखी मदत होईल यात तिळमात्र शंका नाही.

