Site icon LNN

कल्याण डोंबिवलीच्या महापौर–उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट ; महापौरसाठी ॲड.हर्षाली थविल- चौधरी तर उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांचे अर्ज

महापौर आणि उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवलीचा आणखी वेगाने विकास होणार – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण डोंबिवली दि.30 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, या दोन्ही पदांचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. महापौर पदासाठी शिवसेनेच्या ॲड. हर्षाली थविल चौधरी तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून राहुल दामले यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. नगरसचिव किशोर शेळके यांच्याकडे आज हे अर्ज दाखल करण्यात आले. (Kalyan–Dombivli Municipal Corporation Mayor–Deputy Mayor Picture Clear; Adv. Harshali Thavil-Chaudhari Files for Mayor, Rahul Damle for Deputy Mayor)

हे उमेदवारी अर्ज शिवसेना–भाजप तसेच मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसे नेते राजू पाटील, भाजपचे नाना सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने, या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून असून, नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौरपदासाठी शिवसेनेकडून ॲड.हर्षाली थविल चौधरी आणि उपमहापौरपदासाठी भाजपाचे राहुल दामले यांचा अर्ज दाखल केला आहे. आपण विशेष करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते राजू पाटील यांचे आभार मानतो. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे मोठी ताकद शिवसेना-भाजपाची होती पण त्यात मनसेची भर पडली आहे. मनसेची साथ महायुतीला आहे. येणाऱ्या ३ तारखेला महापौर-उपमहापौर बिनविरोध निवडून येतील असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 

Exit mobile version