कल्याण डोंबिवली | २३ जून :
यंदा एल निनो (El Niño) आणि इंडियन ओशन डायपोल (IOD) चा प्रभाव आणि उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येत्या ३० जून आणि ७ जुलै २०२६ रोजी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे.(Kalyan-Dombivli Water Supply to Remain Suspended for 24 Hours on June 30 and July 7)
या निर्णयानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा सोमवार, दि. ३० जून २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवार, दि. १ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल २४ तास बंद राहणार आहे.
त्याचप्रमाणे त्याच्या पुढील सोमवारी म्हणजे ७ जुलै रोजी रात्री रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवार, दि. ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच धरण क्षेत्रातील अपुऱ्या पाणीसाठ्याचा विचार करता, पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार नसल्याचे केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

