कल्याण दि.5 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली युवक काँग्रेसतर्फे आज केडीएमसीच्या कारभाराविरोधात ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. घनकचरा व्यवस्थापनातील अकार्यक्षमता, दूषित पाणीपुरवठा, खराब रस्ते, आरोग्य सुविधांचा अभाव, वाढती वाहतूक कोंडी तसेच शहर विकासातील उदासीनता यांसारख्या मुद्द्यांवर युवक काँग्रेसने यावेळी केडीएमसी प्रशासनाचा निषेध केला. (Kalyan-Dombivli Youth Congress stages ‘Jan Aakrosh’ march at KDMC headquarters; registers strong protest against KDMC’s administration)
या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जपजीत सिंग माटा यांनी केले, तर मोर्चाचे आयोजन कल्याण पश्चिम युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष शादाब खान यांनी केले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांसह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध नोंदवत स्वच्छ पाणीपुरवठा, प्रभावी कचरा व्यवस्थापन, दर्जेदार आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि स्वच्छता उपक्रमांना गती देण्याची यावेळी प्रशासनाकडे मागणी केली.

