Home ठळक बातम्या ‘हर घर तिरंगा ‘ उपक्रमात कल्याण डोंबिवलीकरांनी उस्फुर्त सहभागी व्हावे – केडीएमसी...

‘हर घर तिरंगा ‘ उपक्रमात कल्याण डोंबिवलीकरांनी उस्फुर्त सहभागी व्हावे – केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे

 

कल्याण दि.19 जुलै :
भारतीय स्वातंत्र्याला येत्या 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकारतर्फे “हर घर तिरंगा” उपक्रम राबवण्यात येणार आहे. तो यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकावून उत्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला येत्या 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम राहून देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहण्याच्या उद्देशाने या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या इमारती तसेच नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने ध्वजसंहितेचे पालन करुन राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी केले.

महापालिका क्षेत्रात सुमारे 2 लाख 90 हजार मालमत्ता असून शासनाकडून 2 लाख 10 हजार झेंडयांची मागणी करण्यात आली आहे. हे झेंडे सशुल्क किंमतीत उपलब्ध होणार असून प्रत्येक प्रभागात महापालिकेचे विक्री केंद्र असेल. त्याचप्रमाणे महापालिकेमार्फत बुथ लेव्हल स्वंयसेवकांची नियुक्ती झेंडे वितरणासाठी करण्यात येत आहे,अशीही माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी दिली.

महापालिका परिसरातील सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी तसेच घ्वजसंहितेचे पालन करुन झेंडा लावणे, झेंडयाचा सन्मान ठेवणे ही माहिती सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी विविध सामाजिक संघटनांची बैठकही महापालिकेमार्फत आयोजित करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. या बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा