शांततेच्या मार्गाने बंद करणार
कल्याण दि.23 ऑगस्ट :
बदलापूरमधील “त्या ” घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्याच्या या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या कल्याण डोंबिवलीतील नेत्यांकडून करण्यात आले आहे. (Kalyan Dombivlikar should spontaneously participate in tomorrow’s bandh – appeal of Mahavikas Aghadi)
बदलापूर मध्ये झालेल्या त्या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. लोकांमधील या रोषाला या ‘महाराष्ट्र बंद’च्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जाणार आहे. हा बंद आम्ही संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने करणार असून त्यामध्ये शहरांतील व्यापारी संघटना, ज्वेलर्स असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक संघटना आदींनी आम्हाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी दिली.
तर या बंद दरम्यान औषधे, रुग्णालये, दूध सेवा आदी आपत्कालीन सेवांना वगळण्यात आले आहे. तर शहरातील शाळा – कॉलेजेसनेही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले.
बदलापूर येथील आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून तब्बल 9 तास रेल्वे वाहतूक रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे उद्या लोकल सेवाही बंद करणार का? याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी लोकल सेवा सुरळीत सुरू राहील, आम्ही बंद करणार नाही असे स्पष्ट केले. आम्हाला हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचे असून आम्ही पोलिसांना तशी विनंतीही करणार आहोत. मात्र या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील अशी प्रतिक्रियाही सचिन पोटे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अल्ताफ शेख, कल्याण उप जिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, शहरप्रमुख सचिन बासरे, ज्येष्ठ शिवसैनिक रवी कपोते, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्यासह महविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.