Home ठळक बातम्या पहिल्याच टर्ममध्ये डॉ. श्रीकांत शिंदे राज्यातील टॉप फाइव्ह खासदारांमध्ये  

पहिल्याच टर्ममध्ये डॉ. श्रीकांत शिंदे राज्यातील टॉप फाइव्ह खासदारांमध्ये  

ठाणे दि.13 एप्रिल:

खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव राज्यातील अव्वल पाच खासदारांमध्ये झळकले आहे. इंडिया टुडे या प्रतिष्ठित साप्ताहिकाने देशभरातील खासदारांच्या कामगिरीचा अभ्यास करून जाहीर केलेल्या निष्कर्षांमध्ये राज्यातील खासदारांमध्ये डॉ. शिंदे पाचव्या क्रमांकावर असून देशभरातील अव्वल १५ खासदारांमध्ये ते चौदाव्या क्रमांकावर आहेत. शिवसेना खासदारांच्या कामगिरीत डॉ. शिंदे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

लोकसभेतील उपस्थिती, सरकारला विचारलेले तारांकित व अतारांकित प्रश्न, राज्याच्या बजेटसह विविध विधेयके आणि चर्चांमध्ये घेतलेला सहभाग, खासदार निधीचा विनियोग, मतदारसंघातील कामगिरी आदी कामगिरीच्या आधारे इंडिया टुडेने देशभरातील खासदारांच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला. यात डॉ. शिंदे यांना ए प्लस ग्रेड मिळाली असून राज्यातील पाच सर्वोत्कृष्ट खासदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणात सर्वाधिक ए प्लस मानांकित खासदारांसह शिवसेना अव्वल राजकीय पक्ष ठरला आहे.

सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वाधिक तरुण खासदारांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता. मात्र, संसदेचे कामकाज अल्पावधीतच आत्मसात करून खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीच्या आधारे राज्यातील सर्वोच्च पाच आणि देशातील सर्वोच्च १५ खासदारांमध्ये डॉ. शिंदे यांचा समावेश झाला आहे.

डॉ. शिंदे यांनी लोकसभेत दिव्यांग व्यक्तींना शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षणाचा अधिकार, अवैध घुसखोरांच्या परत पाठवणीसाठी राष्ट्रीय आयोग, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार अथवा स्वयंरोजगार, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा, हिंसाचाराला चालना देणाऱ्या ऑनलाइन गेम्सना आळा आदी महत्त्वाच्या समस्या हाताळण्यासाठी स्वतंत्र कायदे व्हावेत, यासाठी खासगी विधेयके मांडली. तसेच, बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी गोळा केल्या जाणाऱ्या सेसच्या माध्यमातून जमा झालेल्या २६ हजार कोटी रुपयांचा योग्य विनियोग, मध्य रेल्वेवर एसी लोकल, कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीला मंजुरी, डीएफसीसी प्रकल्पग्रस्तांना वाढीव नुकसान भरपाई, चिखलोली स्थानकाला मंजुरी, कल्याण व डोंबिवली स्थानकांचा पुनर्विकास, ठाकुर्ली टर्मिनसला मंजुरी, गृहनिर्माण संकुलांच्या जमिनींवरील खासगी वनांचा शिक्का हटवणे, आदी अनेक महत्त्वाचे  विषय लोकसभेत उपस्थित केले.

८० टक्के राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेतील उपस्थिती ८३ टक्के होती. पाच वर्षांत त्यांनी सरकारला संसदेत एकूण ९०३ प्रश्न विचारले. संसदेत विविध विधेयके आणि विषयांवर होणाऱ्या चर्चांमधला सहभाग, शासनाची धोरणे,मतदारसंघातील कामगिरी या निकषांवर डॉ. शिंदे यांनी प्रभावी कामगिरी केल्याचे इंडिया टुडेच्या विश्लेषणात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*