कल्याण | २४ सप्टेंबर:
गणेशोत्सव म्हटला की विविध सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवरील आकर्षक देखावे साकारण्याची परंपरा महाराष्ट्रात पाहायला मिळते. याच परंपरेला आधुनिक विकासकामाची जोड देत कल्याण एसटी बस डेपोतील कर्मचाऱ्यांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचा हुबेहूब देखावा साकारला आहे. या देखाव्याने एसटी डेपोमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे आणि गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Kalyan ST Depot Creates a Stunning Replica of Mumbai-Pune Missing Link; Creative ST Employees Showcase Maharashtra’s Ambitious Infrastructure Project During Ganeshotsav)
कल्याण एसटी डेपोच्या सार्वजनिक गणेशोत्सव कमिटीच्या वतीने हा देखावा साकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे मिसिंग लिंकची रचना, पूल, बोगदे तसेच प्रकल्पाचे विविध टप्पे यांची माहिती देणारी प्रतिकृती या देखाव्यातून सादर करण्यात आली आहे.
हा देखावा केवळ सजावटीपुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्यक्ष प्रकल्पाची रचना आणि वैशिष्ट्ये बारकाईने अभ्यासून त्याची प्रतिकृती तयार करण्यात आल्याने हा देखावा विशेष आकर्षण ठरत आहे.
या देखाव्याच्या संकल्पना आणि निर्मितीमध्ये आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांच्यासह कर्मचारी सागर तुपलोंढे, सचिन आमकर, शेखर पाटील, देवानंद शिंदे, समीर पठाण, मिलिंद कचवाय, सुनील अरसूळ, समाधान जाधव, नितीन खंडागळे, आतिश बुचडे, बाळासाहेब साळवे, संदेश पंडितकर, भा. रा. पाटील आदींचा सहभाग आहे.
एसटी महामंडळाच्या दैनंदिन सेवेत व्यस्त असतानाही कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या कल्पकतेला आणि कलात्मकतेला वाव देत हा देखावा साकारला आहे. सामाजिक संदेश, महाराष्ट्राचा विकास आणि गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर संगम या देखाव्यातून पाहायला मिळत आहे.
कल्याण एसटी डेपोमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवातील एक विशेष आकर्षण ठरला असून, कर्मचाऱ्यांच्या या कल्पक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

