मंजिरी फडके, मृण्मयी भिडे आणि चेतना भट यांचा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; श्रीराम सेवा मंडळाचा विशेष उपक्रम
कल्याण | १४ नोव्हेंबर
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि आपल्या कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी श्रीराम सेवा मंडळ, कल्याण यांच्या वतीने ‘कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार २०२६’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता कल्याण येथील के. सी. गांधी स्कूल ऑडिटोरियममध्ये हा सोहळा रंगणार आहे. (Kalyan to Celebrate Women of Substance at ‘Navdurga’ Felicitation Event; Special Interaction with Renowned Special Public Prosecutor Ujjwal Nikam to Be a Major Highlight)
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात समाजसेवा – अध्यात्म क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मंजिरी फडके, गायन क्षेत्रातील योगदानासाठी मृण्मयी भिडे आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी चेतना भट यांना ‘कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने त्यांची विशेष प्रकट मुलाखतही आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या कायदेविषयक अनुभवांचा आणि प्रदीर्घ कारकिर्दीचा वेध या मुलाखतीतून घेण्यात येणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विविध क्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कार सोहळ्यामागील मुख्य उद्देश आहे.
तर या सोहळ्यासाठी प्रवेशिका आवश्यक असून, नागरिकांनी प्रवेशिका घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील :
– दिनांक :शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६
– वेळ : सायंकाळी ७ वाजता
– स्थळ : के. सी. गांधी स्कूल ऑडिटोरियम, कल्याण
– प्रवेशिका व माहितीसाठी संपर्क :
– ९८१९६३२०७६ / ९९२०९७७१४५ / ९८७०४९९७९०
स्त्रीशक्तीचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान असा त्रिवेणी संगम या सोहळ्याच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे.

