हर्षवर्धन वावरे, ज्ञानेश्वर मेश्राम, आनंदी जोशी आणि भाग्यश्री देशपांडे यांची सुरेल गीते; कार्यक्रमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत संकलन
कल्याण | २ नोव्हेंबर
भीषण दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातही आशेचा प्रकाश निर्माण व्हावा, या सामाजिक भावनेतून कल्याणमध्ये विशेष ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक सूर माणुसकीचा… बळीराजासाठी मदतीचा!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही सुरेल मैफल मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता कल्याण पश्चिमेतील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मैदान येथे रंगणार आहे. (Kalyan to Host ‘Diwali Pahat’ Musical Morning on November 10 in Support of Drought-Hit Farmers!)
शेतकऱ्यांच्या कष्टातून आपल्या घरातील चूल पेटते आणि त्यांच्या घामातून आपल्या ताटात अन्न येते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे आज अनेक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत बळीराजाच्या मदतीसाठी समाजाने एकत्र येण्याची गरज ओळखून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर आणि भाजप नगरसेवक शामल गायकर हे या कार्यक्रमाचे आयोजक असून नगरसेवक तथा जुने कल्याण शहराध्यक्ष अमित धाक्रस आणि नविन कल्याण भाजप शहराध्यक्ष स्वप्निल काठे यांनी निमंत्रक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी गायक हर्षवर्धन वावरे, ज्ञानेश्वर मेश्राम, आनंदी जोशी आणि भाग्यश्री देशपांडे आपल्या सुमधुर गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती भागवत करणार आहेत.
विशेष म्हणजे, या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारी मदत धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यामुळे संगीताचा आनंद घेण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योगदान देण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच बळीराजाच्या मदतीसाठी सढळ हस्ते देणगी देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘सुरांची पहाट… माणुसकीची साथ… बळीराजाच्या मदतीसाठी एकजुटीचा हात!’ या भावनेतून साकारत असलेला हा उपक्रम यंदाच्या दिवाळीत सामाजिक बांधिलकीचा एक आगळावेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न ठरणार आहे.

