कल्याण दि.26 ऑक्टोबर :
स्थानिक युवा उद्योजकांच्या यशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने जायंटस वेलफेअर फाऊंडेशन फेड 1सीतर्फे ‘उद्यम रत्न पुरस्कार 2025’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कल्याणातील के. सी. गांधी शाळेच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या या भव्य कार्यक्रमात कल्याणातील नामांकित उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात केयुर अवॉर्डसचे सीईओ केयुर मानेक, रमित रुस्तगी (संचालक, रस्तोगी ग्रुप कंपनी) आणि पियूष सेन (संचालक, पीयूष डान्स अकादमी) यांना उद्यम रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सी. पी. जोशी उपस्थित होते. तसेच जायंटस ग्रुपचे फेड 1सी चे अध्यक्ष डॉ. किशोर देसाई,एन. सी. एफ. मनोहर पालन, गगन जैन, संजय गुप्ता, उर्वशी गुप्ता आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सन्मान सोहळ्यानंतर ‘जायंटस के सितारे’ या नावाने एक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात नृत्य, गायन, नाट्य अशा विविध कलाप्रकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः सादर झालेल्या ‘श्रीकृष्ण लिला’ या नाट्यप्रयोगाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजक मंडळाचे मनःपूर्वक कौतुक केले. या सोहळ्यामुळे कल्याणातील युवा उद्योजकांना नवी प्रेरणा मिळाल्याचे मत पुरस्कारकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.

