Site icon LNN

रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या राष्ट्रीय निवडणुकीत कल्याणचे डॉ. प्रशांत पाटील यांचा दणदणीत विजय; १०,९३७ मतांसह राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड

४,९४३ मतांच्या विक्रमी फरकाने आसामच्या डॉ. दिपू बायन यांच्यावर मात; महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

कल्याण | १६ नोव्हेंबर
कल्याणच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. प्रशांत पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. रेडिओलॉजिस्टची देशपातळीवरील शिखर संघटना असलेल्या इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनच्या (IRIA) राष्ट्रीय निवडणुकीत त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत २०२७-२८ या कालावधीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा मान पटकावला आहे. या निवडणुकीत डॉ. पाटील यांना तब्बल १०,९३७ मते मिळाली. त्यांनी आसामचे प्रतिस्पर्धी डॉ. दिपू बायन यांचा ४,९४३ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्यांच्या या विजयामुळे कल्याणसह महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Kalyan’s Dr. Prashant Patil Elected IRIA National Vice President with 10,937 Votes)

नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या IRIA या संघटनेचे देशभरात २७,५६४ सदस्य असून, जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी रेडिओलॉजी संघटना म्हणून तिची ओळख आहे. २०२७ आणि २०२८ या वर्षांसाठी झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत एकूण १५,१२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनल आणि डेमोक्रॅटिक पॅनल यांच्यात प्रमुख लढत झाली. त्यामध्ये प्रोग्रेसिव्ह पॅनलने सर्वच्या सर्व १६ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या पॅनलकडून राष्ट्रीय उपाध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणाऱ्या डॉ. प्रशांत पाटील यांचा विजय विशेष लक्षवेधी ठरला.

डॉ. प्रशांत पाटील यांची कारकीर्द : वैद्यकीय नेतृत्वासोबत सामाजिक कार्याचा ठसा
डॉ. प्रशांत पाटील यांची ओळख केवळ यशस्वी रेडिओलॉजिस्ट म्हणून मर्यादित नसून, कल्याणातील एक सक्रिय सामाजिक व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी संघटक म्हणूनही आहे. त्यांच्या व्यापक जनसंपर्काचा आणि संघटनात्मक नेतृत्वाचा प्रत्यय विविध जबाबदाऱ्यांमधून आला आहे.

कोविडच्या अत्यंत कठीण काळात कल्याण-डोंबिवली परिसरात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत केडीएमसीच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ‘डॉक्टर आर्मी’च्या माध्यमातून अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी पुढाकार घेतला. या उपक्रमात डॉ. प्रशांत पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. या सामूहिक प्रयत्नांमुळे अनेक रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यास हातभार लागला.

संघटनात्मक क्षेत्रातील त्यांची वाटचालही उल्लेखनीय आहे. त्यांनी तीन वर्षे इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), कल्याणचे अध्यक्षपद भूषवले. त्यानंतर २०२५ मध्ये महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. राज्यस्तरावरील नेतृत्वानंतर आता IRIA या राष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीत वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव, संघटन कौशल्य आणि सहकाऱ्यांशी असलेला संवाद महत्त्वाचा ठरला आहे.

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रासोबतच कल्याणच्या सांस्कृतिक व सार्वजनिक जीवनातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या पुढाकारातून गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याणमध्ये भव्य नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाने शहरातील नागरिकांना एकत्र आणत मराठी संस्कृती आणि नववर्ष स्वागताचा उत्साह अधोरेखित केला.

राष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वपूर्ण विजयामुळे डॉ. प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला रेडिओलॉजीच्या राष्ट्रीय व्यासपीठावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीमुळे कल्याणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Exit mobile version