आ. गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एका दिवसाचा पगार
कल्याण दि.2 ऑक्टोबर :
बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी- महापूरामुळे बळीराजा फार मोठ्या आस्मानी संकटात सापडला असून
एसटीच्या कल्याण आगारातील 50 चालक-वाहक कर्मचारी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांनी शेतकरी बांधवांप्रती माणुसकी जपत आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बीड, धाराशिवसह राज्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे पिके, साठवलेले धान्य, जनावरे तसेच उपजीविकेच्या इतर वस्तू वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या कठीणप्रसंगी एसटी कर्मचारीही आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसत आहे.
“लालपरी”ला भक्कमपणे उभे करण्यामागे गावोगावीच्या शेतकरी बांधवांचा मोलाचा वाटा असल्याची भावना व्यक्त करत कल्याण आगारातील चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी आपल्या सप्टेंबर महिन्यातील (पेड इन ऑक्टोबर) एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र कल्याण एसटी आगार व्यवस्थापक महेश भोये यांना देण्यात आले.
सेवा-शक्ती-संघर्ष एसटी कर्मचारी संघ, कल्याण आगार यांच्या माध्यमातून देण्यात येत असून संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि मुख्य मार्गदर्शक विकी तरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढाकार घेण्यात आला आहे. यावेळी विभागीय टीममधील सागर तुपलोंढे, संदेश पंडीतकर, आगार टीममधील आतिश बुचडे, निकेश तोडसाम, विवेक उईके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करताना “फुल नाही पण फुलाची पाकळी” म्हणून आमचे हे योगदान असल्याची भावनाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.