नवी मुंबई, दि. 24 ऑक्टोबर :
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात यावे, या मागणीसाठी पाचही सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्र गेल्या अनेक वर्षांपासून एकदिलाने लढा देत आहेत. या मागणीला आता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले असून त्याचाच एक भाग म्हणून करावे ग्रामस्थांच्या वतीने “दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” या दिशादर्शक फलकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. (Karave villagers unveil signboard for Loknete D. B. Patil International Airport)
नवी मुंबईच्या करावे गावातील टी. एस. चाणक्य सिग्नल, पाम बीच रोड येथे हा फलक लावण्यात आला आहे. यासाठी करावे गाव सुधार समितीचे अध्यक्ष योगेश तांडेल आणि दोस्ती ग्रुप यांनी विशेष पुढाकार घेतला असून गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि तरुण कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमानंतर झालेल्या चर्चासत्रात ग्रामस्थांनी दि. बा. पाटील यांच्या नावाने विमानतळाचे नामकरण होईपर्यंत ही चळवळ सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच आगामी काळात जर आंदोलन पुन्हा उभारले गेले, तर करावे गाव त्याचे यजमानत्व स्वीकारेल, अशी भूमिकाही ग्रामस्थांनी स्पष्ट केली.
काही दिवसांपूर्वी भूमिपुत्रांचे लोकप्रिय खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी–नवी मुंबई–जासई या मार्गावर ३ हजारहून अधिक कार सहभागी झालेल्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विशेष बैठक बोलावून या विषयावर चर्चा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नामकरणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच याबाबत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास काही काळ लागेल, असे आश्वासनही दिले होते.
यानंतर ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे तांत्रिक उद्घाटन झाले असले तरी नामकरणाबाबत अद्याप कोणताही उल्लेख न झाल्याने भूमिपुत्रांमध्ये नाराजी पसरली आहे. “जोपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव लागत नाही, तोपर्यंत ही चळवळ सुरू राहणार,” असा निर्धार करावे ग्रामस्थांनी या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला.

