Site icon LNN

विविध अडथळ्यांवर मात करत कातकरी महिलांना मिळाली महिला शेतकरी म्हणून अधिकृत ओळख

कल्याण ग्रामीण | २ नोव्हेंबर
शेतीमध्ये प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या नवगाव येथील कातकरी आदिवासी महिलांना महिला शेतकरी म्हणून शासकीय स्तरावर अधिकृत ओळख मिळवून देण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर महिलांची शासकीय पोर्टलवर नोंदणी करून महिला शेतकरी प्रमाणपत्रे मंजूर करण्यात आली. श्रमिक मुक्ती संघटनेचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी या संपूर्ण प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला. (Overcoming Numerous Challenges, Katkari Women Earn Official Recognition as Women Farmers!)

महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत अनेक प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी समोर आल्या. नोंदणीसाठी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येणे आवश्यक होते. मात्र, काही महिलांचे आधारशी जोडलेले जुने मोबाईल क्रमांक बंद झाले होते, काही महिलांकडे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे नव्हते, तर काहींचे सिमकार्ड हरवले होते. त्यामुळे सर्वप्रथम या अडचणी दूर करून मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

त्यानंतर महिला शेतकरी पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आली. यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधला असता ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ग्रामसेविकांची भेट घेऊन नोंदणीसाठी पात्र महिलांची यादी सादर करण्यात आली आणि ग्रामसभेचा आवश्यक ठराव प्राप्त करण्यात आला. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. अखेर सर्व महिलांची प्रमाणपत्रे ऑनलाइन मंजूर झाली.

प्रमाणपत्रे डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढल्यानंतर वाडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, शेतकरी म्हणून मिळणारी अधिकृत ओळख तसेच भविष्यात विविध शासकीय कृषी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी या प्रमाणपत्राची उपयुक्तता याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला. आधार कार्डशी मोबाईल क्रमांक जोडण्यापासून ते ग्रामसभेचा ठराव, ऑनलाइन नोंदणी आणि प्रमाणपत्र मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशाल जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या कामासाठी कृषी पर्यवेक्षक प्रविण बिऱ्हाडे आणि ग्रामसेविका सुप्रिया मुरबाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले..

Exit mobile version