Site icon LNN

केडीएमसीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना २१ हजारांचा दिवाळी बोनस; आशा वर्कर्सनाही वाढीव लाभ – महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांची घोषणा

महापालिका कर्मचाऱ्यांच्या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ

कल्याण | २७ ऑक्टोबर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदाच्या दिवाळीत आनंदाची बातमी आहे. महापालिकेच्या वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील अधिकारी – कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी २१ हजार रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांनी केली. त्याचबरोबर आशा वर्कर्सच्या सानुग्रह अनुदानातही वाढ करण्यात आली असून त्यांना यंदा ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. (KDMC Announces ₹21,000 Diwali Bonus for Officers and Employees; ASHA Workers to Receive Enhanced Benefits — Mayor Adv. Harshali Chaudhary-Thawil Announces)

महापौरांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्मचाऱ्यांच्या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ…
गतवर्षी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपये मिळणार आहेत.

आशा वर्कर्सनाही वाढीव सानुग्रह अनुदान…
महापालिका क्षेत्रात आरोग्यविषयक सेवा आणि जनजागृतीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्सच्या सानुग्रह अनुदानातही वाढ करण्यात आली आहे. यंदा त्यांना ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबतच आशा वर्कर्सनाही या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.

बैठकीला महापालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित…
या बैठकीला महापालिका आयुक्त अभिनव गोयल, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे, भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे, काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी, महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा अधिकारी निलेश नलावडे, महापालिका सचिव किशोर शेळके आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे उपस्थित होते.

तसेच कामगार संघटनेचे नेते सचिन बासरे, चरणसिंग टाक आणि प्रतीक पेणकर यांच्यासह अन्य प्रतिनिधीही या वेळी उपस्थित होते.

महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात वाढ करण्याच्या निर्णयामुळे यंदाच्या दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून, आशा वर्कर्सनाही वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

Exit mobile version