Home कोरोना परदेशात जाऊन आलेले नागरिक ट्रीटमेंटसाठी आल्यास तातडीने कळवा – केडीएमसीचे डॉक्टरांना आवाहन

परदेशात जाऊन आलेले नागरिक ट्रीटमेंटसाठी आल्यास तातडीने कळवा – केडीएमसीचे डॉक्टरांना आवाहन

कोवीड नियमांबाबत नागरिकांमध्ये काहीशी शिथिलता आली असून वेळ पडल्यास कारवाईचा इशारा

कल्याण – डोंबिवली दि.29 नोव्हेंबर :
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या आणि कोवीड पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णानंतर केडीएमसी प्रशासन सतर्क झाले असून खबरदारीचे उपाय म्हणून त्यांनी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जगातील युके, साऊथ आफ्रिका, बेल्जियम, बोत्सवाना, हॉंगकॉंग आणि इज्राईल या 6 देशांतून आलेल्या व्यक्ती उपचारासाठी आल्यास तातडीने केडीएमसीला माहिती देण्याचे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. तसेच कोवीड नियमांबाबत नागरिकांमध्ये काहीशी शिथिलता आली असून वेळ पडल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जगभरातील युके, साऊथ आफ्रिका, बेल्जियम, बोत्सवाना, हॉंगकॉंग आणि इज्राईल या 6 देशांमध्ये कोवीडचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले असून या देशांतून येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यातच गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि दिल्लीमार्गे डोंबिवलीत आलेल्या आणि कोवीड पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाने केडीएमसीची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सुदैवाने या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर सर्वांची कोवीड चाचणी निगेटिव्ह आल्याने केडीएमसी प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तर संबंधित व्यक्तीचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल आल्यानंतरच कोवीडच्या व्हेरियंटबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासन मात्र कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीये. संभाव्य धोका लक्षात घेता केडीएमसी प्रशासनाने पाऊले टाकण्यास सुरवात केली असून आज संध्याकाळी कल्याण डोंबिवलीतील जनरल प्रॅक्टिशनर आणि हॉस्पिटल चालक- मालकांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्हीसी घेतली.
त्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनरना आवाहन केले की या 6 (साऊथ आफ्रिका, बोत्सवाना, हॉंगकॉंग, बेल्जियम, इजरायल) देशांत जाऊन आलेल्या व्यक्ती ट्रीटमेंटसाठी आल्यास तात्काळ केडीएमसीला माहिती देण्याचे आवाहन केले.

तर नागरिकांमध्ये मास्क घालून बाहेर पडण्यासह कोवीडच्या इतर नियमांचा वापर आणि त्याचे गांभीर्यही कमी झाल्याचे दिसत आहे. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्ससारखे नियम पाळावे अन्यथा येत्या काही दिवसांत पोलिसांच्या सहकार्याने पुन्हा एकदा कारवाई सुरू करू असा इशाराही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.

तर कोरोना रुग्ण वाढल्यास आयसीयू बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनची तयारी गेल्या वेळेपेक्षा तिप्पट उपलब्ध आहेत. नागरिकांनी कोवीडचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे. टेस्टिंग वाढवण्याचा विचार करतोय सोशल डिस्टन्सवर बंधनं आणावी लागतील असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

मागील लेखकल्याण डोंबिवली महापालिकेच्या 30 नोव्हेंबर 2021 रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 11 रुग्ण तर 15 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा