Site icon LNN

केडीएमसी निवडणुकीच्या तयारीला वेग; राजकीय पक्षांसोबत झालेल्या प्रशासकीय बैठकीत आचारसंहिता, खर्च मर्यादा, पेड न्यूजवर चर्चा

कल्याण डोंबिवली दि.20 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर आज महापालिका भवनातील स्थायी समिती सभागृहात आयुक्त तथा प्रशासक अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि प्रतिनिधींसोबत समन्वय बैठक पार पडली. (KDMC Election Preparations Gain Momentum; Model Code of Conduct, Spending Limits and Paid News Discussed in Meeting with Political Parties)

या बैठकीस महापालिका क्षेत्रातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीदरम्यान निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे नियम, आदर्श आचारसंहिता, उमेदवारांचा खर्च आणि माध्यमांवरील नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त व आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख हर्षल गायकवाड यांनी निवडणूक काळात काय करावे आणि काय टाळावे याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

निवडणूक विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी नामनिर्देशन, प्रचार, मतदान आणि मतमोजणीसह संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा दिला. तर मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर प्रकाश टाकताना प्रति उमेदवार ११ लाख रुपयांची खर्च मर्यादा असल्याचे स्पष्ट केले. नामनिर्देशनापासून निकाल जाहीर होईपर्यंत हा खर्च लागू राहणार असून उमेदवारांनी दररोजचा खर्च नोंदवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. निकालानंतर एका महिन्यात खर्चाचा तपशील सादर करणेही आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी महापालिका मुख्यालयात राबविण्यात येणाऱ्या ‘वन विंडो सिस्टिम’ (एक खिडकी योजना) बाबत माहिती दिली. माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी संजय जाधव यांनी पेड न्यूजसंदर्भातील नियम, निकष आणि कारवाईची माहिती दिली. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

बैठकीच्या शेवटी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे यांनी समर्पक उत्तरे देत आवश्यक मार्गदर्शन केले.

Exit mobile version