Home कोरोना परदेशातून आलेल्या 109 जणांच्या शोधात केडीएमसी ; 7 दिवसांचे होम कॉरंटाईन बंधनकारक...

परदेशातून आलेल्या 109 जणांच्या शोधात केडीएमसी ; 7 दिवसांचे होम कॉरंटाईन बंधनकारक – डॉ. विजय सूर्यवंशी

मास्कविरोधातील कारवाई उद्यापासून पुन्हा सुरू होणार

कल्याण डोंबिवली दि.6 डिसेंबर :
कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी यंत्रणेने खबरदारी आणि उपाययोजनांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून गेल्या काही दिवसांत कल्याण डोंबिवलीत 295 नागरिक आले असून त्यापैकी 109 जणांचा शोध घेतला जात असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 295 नागरिकांपैकी 88 जणांची कोवीड चाचणी करण्यात आली. त्यापैकी 34 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून उर्वरित 48 जणांचे रिपोर्ट आद्यप येणे बाकी आहेत. यातील 34 लोकं ही केडीएमसी बाहेरचे रहिवासी असून उर्वरित 109 जणांशी संपर्क साधण्यासाठी केडीएमसी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र अनेकांचे फोन बंद येत आहेत तर अनेकांच्या घराला कुलूप असल्याने संपर्कात अडथळा येत असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

परदेशातून कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ऍट रिस्क (कमी धोक्याचे देश) आणि हाय रिस्क (अति धोक्याचे देश) देशातून येणाऱ्या व्यक्तींना 7 दिवसाचे होम कॉरंटाईन बंधनकारक आहे. या 7 दिवसांत नियंत्रण ठेवण्यासाठी कॉल सेंटरमधून फोनद्वारे संपर्क साधण्यासह केडीएमसीचे मेडिकल ऑफिसरही त्याठिकाणी सरप्राईज व्हिजिट करणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. तसेच 8 व्या दिवशी त्यांची कोवीड टेस्ट होणार असून त्यात निगेटिव्ह आले तरीही परत 7 दिवसांचे होम कॉरंटाईन आणि पॉझिटिव्ह आल्यास केडीएमसीच्या संस्थात्मक कॉरंटाईन केले जाईल. तर ज्या सोसायटीमध्ये अशा व्यक्ती राहत असतील त्या नियमानुसार होम कॉरंटाईन करतात की नाही याची खबरदारी सोसायटीने घेण्याचे निर्देश देत उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाईचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे.

मास्क न घालणाऱ्यांविरोधात उद्यापासून पुन्हा कडक कारवाई…
गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालता वावरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा व्यक्तींविरोधात उद्यापासून पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याची माहितीही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. याशिवाय लग्न समारंभ , मोठे कार्यक्रमांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होतेय की नाही यावरही करडी नजर असेल असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

लस न घेतलेल्यानी लगेचच कोवीड लस घेण्याचे आवाहन…
कोरोनाला अटकाव घालण्यात कोवीड लस ही महत्वाचा घटक असून ज्या लोकांनी अद्याप लस घेतलेली नसेल त्यांनी तातडीने लस घेण्याचे आवाहनही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले. तर कल्याण डोंबिवलीमध्य आतापर्यंत 72 टक्के नागरिकांचा पहिला आणि 52 टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला झाला असल्याचेही ते म्हणाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा