Home ठळक बातम्या खड्डे भरण्यासाठी केडीएमसीकडून आता पॉट फिल फिक्स तंत्रज्ञानाचा प्रयोग

खड्डे भरण्यासाठी केडीएमसीकडून आता पॉट फिल फिक्स तंत्रज्ञानाचा प्रयोग

मात्र कामाचा दर्जा तपासून निर्णय घेणार – शहर अभियंता अर्जुन अहिरे

कल्याण दि.२२ डिसेंबर: 

कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी केडीएमसीकडून आता ‘पॉट फील फिक्स’ सेटिंग तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या नविन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कल्याण स्टेशन परिसरातील रस्त्यावर खड्डा भरून दाखवण्यात आले. या कामाचा दर्जा तपासून हे तंत्रज्ञान सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यावर यशस्वी ठरले तरच पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची प्रतिक्रीया शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.

दरवर्षी पावसाळयापूर्वी आणि त्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि भरण्याचे काम सुरु असते. खड्डे भरत असताना वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. तसेच भरलेले खड्डे सेट होण्यास कालावधी मिळत नाही. सततच्या वाहतुकीमुळे भरलेल्या खड्ड्याची परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे या दरम्यान अनेक सिमेट आणि कॉन्क्रीटच्या क्षेत्रात कार्यरत कंपनीकडून आपल्या प्रोड्क्टच्या किफायतशीरपणाचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात आता आणखी एका कंपनीने शहरातील खड्डे कमीत कमी वेळेत भरण्यासह दर्जा राखण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा या कंपनीकडून करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेकडील सर्वाधिक रहदारी असलेल्या स्टेशन परिसरातील रस्त्यावर या तंत्रज्ञांनाचा प्रयोग करण्यात आला.

असे आहे हे नवे तंत्रज्ञान..

पॉट फील फिक्स सेटिंग असे या तंत्रज्ञानाचे नाव असून यात रस्त्यावरील खड्ड्यात खड्डा भरेल इतके पाणी ओतले जाते. यानंतर या पाण्यातच खडी, सिमेंट आणि इतर जलद घट्ट होणारे रसायन मिक्स असलेले कॉंक्रीटचे मिश्रण ओतण्यात आले आणि या मिश्रणावरून पाण्याचा फवारा मारत वाहतूक सुरु करण्यात आली. त्यात आसलेल्या रसायनच्या मिश्रणावर दाब पडताच हे मिश्रण खड्ड्यात घट्ट बसत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यावर हा प्रयोग करण्यात आला असून डांबरी रस्त्यावरील खड्डयासाठीही हा प्रयोग केला जाणार आहे. तसेच हे पॉट फिलिंग किती दिवस टिकणार आणि त्याचा दर्जा कसा आहे याची तपासणी करून या पद्धतीचा वापर खड्डे भरण्यासाठी करायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा