Site icon LNN

कर वसुलीसाठी केडीएमसी ॲक्शन मोडवर : थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून कायदेशीर कारवाईचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

कल्याण डोंबिवली दि.8 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर वसुलीसाठी केडीएमसी ॲक्शन मोडमध्ये आली आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यासह कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिले आहेत. (KDMC on action mode for tax recovery: Additional Commissioner directs legal action by seizing properties of defaulters)

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कर करप्रणालीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना कर वसुलीवर लक्ष केंद्रित करून अधिकाधिक करवसुली करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी २/ब प्रभाग आणि ३/क प्रभाग क्षेत्र कार्यालयास भेट देत सहाय्यक आयुक्तप्रीती गाडे आणि धनंजय थोरात यांच्याकडून प्रभागातील कर वसुलीचा आढावा घेतला. यावेळी कर विभागातील अधिक्षक/वरिष्ठ लिपीक, भागलिपीक यांच्याकडून भागनिहाय थकबाकीदारांची यादी, सर्वोच्च थकबाकीदार आणि वारंवार नोटीस बजावूनही थकबाकी असलेल्या मालमत्ता करधारकांची माहिती संकलीत करण्याच्या सूचना केल्या. तसेच या थकबाकीदारांवर तातडीने जप्ती, लिलाव तसेच कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त गोडसे यांनी दिले.

तर या आढावा बैठकीत प्राप्त थकबाकीदारांच्या यादीनुसार अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी ३/क प्रभागातील अधीक्षक बजागे यांचेसमवेत एका थकबाकीदाराच्या कार्यालयास भेट देऊन १९ लाख ८९ हजार ५८२ रुपये थकबाकीची वसुली केली.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांना करवसुलीसाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याच्या सूचना करतानाच नागरिकांनीही आपला कर वेळेत भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version