Home ठळक बातम्या गुड न्यूज : स्वच्छता सर्वेक्षणात कल्याण डोंबवलीची 97 व्या स्थानावरून 77 व्या...

गुड न्यूज : स्वच्छता सर्वेक्षणात कल्याण डोंबवलीची 97 व्या स्थानावरून 77 व्या स्थानी झेप ; मात्र अद्यापही मोठा पल्ला बाकी

कल्याण दि.7 मार्च :
देशातील स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये कल्याण डोंबिवलीने गेल्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी करीत 77 वा क्रमांक मिळवला आहे. गेल्यावर्षी करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात कल्याण डोंबिवली 97 व्या स्थानावर फेकले गेले होते. त्या तुलनेत यंदा मिळवलेला 77 वा क्रमांक निश्चितच समाधानकारक असून शेजारील शहरांचा विचार केला तर अद्याप मोठा पल्ला गाठणे बाकी आहे.

कचरा, डंपिंग ग्राउंड आणि अस्वछता या मुद्द्यांवर कल्याण डोंबिवली महापालिका गेल्या काही वर्षात सतत टिकेची धनी बनली आहे. सद्यस्थितीचा विचार करता आता परिस्थितीत कितपत फरक पडला असा प्रश्न आपल्या सर्वांना पडणे साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली स्वच्छ शहरांची यादी आपल्याला निश्चितच काहीसा दिलासा देणारी ठरली आहे. 2016 पासून केंद्र सरकारने स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण सुरू केले. या पहिल्या वर्षी 70 शहरांमध्ये कल्याण डोंबिवलीचा रसातळाचा म्हणजेच तब्बल 67 वा क्रमांक होता. त्याच्या पुढच्या वर्षी 2017 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात 400 शहरांमध्ये हाच क्रमांक 234 व्या स्थानावर आला. त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने हे सर्वेक्षण गांभीर्याने घेत अनेकविध उपाययोजना राबवल्या.

ज्याचा सकारात्मक आणि दृश्य परिणाम 2018 च्या सर्वेक्षणात झालेला पाहायला मिळाला. 2018 म्हणजेच गेल्यावर्षी तब्बल 4 हजार शहरांच्या यादीमध्ये कल्याण डोंबिवलीने 97 वा क्रमांक प्राप्त केला. तर यंदा शहरातील स्वछता, कचऱ्याचे विविध प्रकल्प आणि उपाय योजना युद्धपातळीवर राबवल्या गेल्याने कल्याण डोंबिवलीने 77 व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यातही वाडेघर डम्पिंग ग्राउंड अद्यापही बंद न झाल्याने आणि ओला -सुका कचरा वर्गीकरण योग्य तऱ्हेने होत नसल्याने स्वछ सर्वेक्षणात आपले बरेच पॉइंटस कमी झाले आहेत.

असे असले तरी शेवटून तिसऱ्या क्रमांकावरून कल्याण डोंबिवलीने पहिल्या 100 स्वच्छ शहरांत पटकावलेला 77 वा क्रमांक निश्चितच समाधानकारक आहे. स्वच्छतेचा हा आलेख असाच चढता ठेवण्यासाठी सत्ताधारी, प्रशासन आणि इथल्या नागरिकांनी आपली इच्छाशक्ती तसेच सहभाग कायम राखण्याची गरज आहे.

कल्याण डोंबिवलीला लागलेलं ‘घाणेरडं’ लेबल काढण्यासाठी प्रयत्नशील – महापौर विनिता राणे
कल्याण डोंबिवलीला लागलेले घाणेरड्या शहराचे लेबल काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. महापालिकेचे कामगार, अधिकारी वर्गाने पूर्ण तयारी करीत हा अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. हळूहळू शहरांमध्ये सुधारणा होत असून नागरिकांनीही आपले सहकार्य असेच करण्याची गरज आहे.

 77वा क्रमांक चांगली गोष्ट मात्र अद्याप मोठा पल्ला बाकी – स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे
नुकत्याच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात कल्याण डोंबिवलीने मिळवलेला 77 वा क्रमांक ही चांगली गोष्ट असली तरी आम्ही त्याबाबत तितकेसे समाधानी नाही. कल्याण डोंबिवलीला आणखी सुंदर करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी, अधिकारी वर्ग प्रयत्नशील आहोत. अद्याप बराच मोठा पल्ला गाठणे बाकी असून शहरं स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा प्रतिसादही तितकाच आवश्यक आहे.

“पहिल्या 20 मध्ये येण्यासाठी कल्याण डोंबिवलीला आणखी 20 वर्ष लागणार – विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर”
77 वा क्रमांक येणं ही सत्ताधाऱ्यांसाठी आनंदाची बाब असली तरी आमच्या दृष्टीने ती खेदाची गोष्ट आहे. एवढ्या मोठया प्रमाणात निधी खर्च करूनही स्वच्छतेच्या बाबतीत एवढ्या कमी वेगाने होणारी प्रगती निश्चितच कौतुकास्पद नाही. या वेगाने स्वच्छतेच्या उपाय योजनांची अंमलबजावणी सुरू राहिल्यास पहिल्या 20 मध्ये येण्यासाठी आपल्याला आणखी 20 वर्षे लागतील.

 

आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणातील कल्याण डोंबिवलीची कामगिरी… 

वर्ष                         सहभागी शहरे                  कल्याण डोंबिवलीचा क्रमांक

2016                              70                                           67 वा
2017                             400                                        234 वा
2018                             4000                                        97 वा
2019                             4237                                        77 वा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*