Home कोरोना केंद्र सरकारच्या ‘कोवीड इनोव्हेशन’ पुरस्कारांत केडीएमसी अव्वल

केंद्र सरकारच्या ‘कोवीड इनोव्हेशन’ पुरस्कारांत केडीएमसी अव्वल

 

केंद्र सरकारकडून करण्यात आली पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली दि.25 जून :
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या कोवीड इनोव्हेशन अवॉर्डमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे. कोवीड काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल कल्याण डोंबिवली महापालिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीला संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज खात्याचे राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या अध्यक्षतेखाली आज स्मार्ट सिटीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

देशभरातून 100 महानगरपालिकांनी या पुरस्कारासाठी कोवीड काळात केलेल्या कामाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले होते. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आयएमएच्या खासगी डॉक्टरांसह राबवलेल्या फॅमिली डॉक्टर-कोवीड फायटरसह खासगी डॉक्टरांच्या ‘कोवीड आर्मी’ उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली. पहिल्या फेरीत केडीएमसीने पहिल्या 10 मध्ये मजल मारली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या अंतिम फेरीत वाराणसी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेला संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. लवकरच नवी दिल्ली येथे एका सोहळयात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

कोवीड व्यवस्थापन करत असताना आपण काय नाविन्यपूर्ण उपाय योजना केल्या त्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. कोवीड काळात आपल्या वेबपोर्टलला देश पातळीवर मान्यता मिळाली होती. ज्या पद्धतीने अत्यंत तुटपुंज्या साधनांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेने यशस्वीपणे कोवीडशी लढा दिला त्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तर हा पुरस्कार म्हणजे आयएमए डॉक्टर्स, खासगी डॉक्टर्स, महापालिका डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा, लोकप्रतिनिधी, सर्व नागरिकांचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रियाही डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. तर नागरिकांना अत्युत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासह आरोग्य यंत्रणा बळकट करणार,आणि स्मार्ट सिटीअंतर्गत चांगल्या सुविधा निर्माण करण्याचे आमचे पुढील उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तर कोवीडच्या सुरुवातीच्या काळात कल्याण डोंबिवलीची आरोग्य व्यवस्था ज्या पातळीवरील होती. त्यानंतर डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राबवलेल्या उपाय योजनांमूळे केडीएमसीला हा पुरस्कार मिळणे क्रमप्राप्त असल्याची प्रतिक्रिया कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. तर डॉक्टर आर्मीने कोवीड नियंत्रणात आणण्यात मोठे भूमिका बजावली असून संपूर्ण देशभरात अशी आर्मी केवळ कल्याण डोंबिवलीतच स्थापन झाली. ज्यामुळे कोवीड रोखण्यात मोठी मदत झाली. हा पुरस्कार म्हणजे केडीएमसीचा सर्वात मोठा बहुमान असून याचे श्रेय डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या टीमला जात असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

पुरस्कार जाहीर होताच अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली, सचिव संजय जाधव, उपायुक्त रामदास कोकरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने आनंदोत्सव साजरा केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा