Home कोरोना केडीएमसीच्या लसीकरणात नियोजन आणि सुसूत्रता नाही – आमदार राजू पाटील

केडीएमसीच्या लसीकरणात नियोजन आणि सुसूत्रता नाही – आमदार राजू पाटील

 

डोंबिवली दि.10 जुलै :
केडीएमसीकडून केल्या जाणाऱ्या लसीकरणात अजिबात नियोजन आणि सुसूत्रता नसून केंद्र सरकारच्या लसीवर आणखी किती दिवस अवलंबून राहणार असा संतप्त सवाल कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. आमदार राजू पाटील यांच्यातर्फे आयोजित 3 दिवसीय मोफत लसीकरण मोहीमेला आजपासून सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेल्या लसीकरणावरून केडीएमसीवर टिका केली.

शासकीय लस तुटवड्यावर उपाय म्हणून नवी मुंबई महापालिकेने 10 हजार डोसची ऑर्डर दिली असून लवकरच त्यांना हे डोस प्राप्त होतील. आपल्याकडे केडीएमसीकडून मात्र तसे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्याचे आमदार पाटील म्हणाले. सरकारकडून डोस आले तरीही त्यात नागरिकांच्या कराचा पैसा असतो आणि खासगी कंपन्यांकडून विकत घेतले तरीही लोकांच्याच कराचे पैसे जातात. एकीकडे कोवीड सेंटरवर कोट्यवधींचा खर्च होत असताना लोकांच्या लसीकरणासाठी केडीएमसीकडून काही तरी उपाययोजना करणे आवश्यक होत्या. केंद्र सरकारच्या लसीवर किती दिवस अवलंबून राहणार असा सवाल विचारत केडीएमसी प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आपण ही 3 दिवसीय मोफत लसीकरण मोहीम राबवल्याचे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

 

विशेष म्हणजे 2 महिन्यांपूर्वीच आम्ही ही लसीकरणासाठी सुविधा उभारली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेकडे लससाठा आणि लसीकरण नोंदणीसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहारही आपण केला होता. मात्र केडीएमसी प्रशासनाने ते उपलब्ध करून दिले नसल्याचे पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी सांगितले. कल्याण ग्रामीण भागातून केडीएमसी केवळ कर घेते, मात्र आम्हाला आरोग्यसेवा निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळते तर इथल्या शाळा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. त्यामूळे हा भाग केडीएमसीकडून तसा वाळीत टाकल्यासारखा असल्याची उद्विग्नताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर राजकारण करणे हा राजकीय पक्षाच्या वाटचालीचा एक भाग आहे, आम्हीही ते करतो. परंतू आताच्या पॅनडेमिकमध्ये लोकांसाठी काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला अशा राजकीय टिकेमध्ये अजिबात स्वारस्य नसल्याचेही आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आजपासून सुरू झालेल्या या 3 दिवसीय मोफत लसीकरण मोहीमेत रिक्षाचालक, जिम चालक, सलून कामगार, घरकाम करणाऱ्या महिला आदींचे लसीकरण केले जाणार आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 114 रुग्ण तर 128 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल,बार आणि दुकाने केडीएमसीकडून सील

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा