Home ठळक बातम्या आमने-सामने”; नागरी समस्यांबाबत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल तर प्रशासनाची कार्यक्रमाला दांडी

आमने-सामने”; नागरी समस्यांबाबत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल तर प्रशासनाची कार्यक्रमाला दांडी

 

कल्याण दि.19 नोव्हेंबर :
कल्याण, डोंबिवलीतील रस्ते,अनधिकृत बांधकाम आणि विशेषतः आरोग्य सुविधेच्या मुद्द्यांवर नागरिकांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले. निमित्त होते कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित ‘आमने-सामने’ कार्यक्रमाचे. मात्र महापालिका प्रशासनाने अनुपस्थिती दर्शवून याठिकाणीही आपल्या उदासीनतेचे दर्शन घडवले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना भाजपच्या सत्तेला दोन वर्ष पूर्ण झाली यानिमित्ताने ‘पंचनामा शहर विकासाचा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधीपक्षनेते मंदार हळबे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे असे सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. पत्रकार संघाच्या प्रश्नांनंतर नागरिकांनी उपस्थित सत्ताधाऱ्यांना रस्ते, खड्डे, अनधिकृत बांधकामं, वाहतूक कोंडी, फेरीवाले आदी मुद्द्यांवर खडसावून जाब विचारला. त्यातही ठाकुर्ली येथील एका महिलेने वेळेत उपचार न मिळाल्याने आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि सारे सभागृह स्तब्ध झाले. “3 -3 रुग्णालयांमध्ये फिरूनही योग्य उपचार मिळत नसतील तर काय करायची आहे ती स्मार्ट सिटी? या तिच्या प्रश्नावर सर्वच जण निरुत्तर झालेले पाहायला मिळाले. तर नागरिकांनी मात्र रुख्मिणीबाई रुग्णालयातील भोंगळ कारभार आणि डोंबिवलीतील सूतिकागृहाच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना खडसावून जाब विचारला.

त्यावर बोलताना रुख्मिणीबाई रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्यासाठी आम्ही ठराव संमत केला आहे. परंतू शासन स्तरावर कोणताच निर्णय होत नसल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले.

तर 6 हजार 500 कोटी रुपयांबाबत बोलताना उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी सांगितले की यासंदर्भातील विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून येत्या काळात त्यादृष्टीने कामे झालेली पाहायला मिळतील असे स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी सेना-भाजपच्या अंतर्गत कुरघोडींवर हल्ला करीत देशापासून राज्यात यांचीच सत्ता असताना राज्य शासनाकडून निधी का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित केला.

तर माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारचा दाखला देत इकडे आमची सत्ता नसतानाही काँग्रेस सरकारने कल्याण डोंबिवलीला भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत सेना-भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांनीही विविध नागरी समस्यांवर सत्ताधाऱ्यांना खड्डे, आरोग्य सुविधा अशा अनेक मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*