Home ठळक बातम्या क्या बात है ; पहिल्याच राष्ट्रीय बायोडायवर्सिटी परिषदेत केडीएमसीच्या जैव विविधता उद्यानाला...

क्या बात है ; पहिल्याच राष्ट्रीय बायोडायवर्सिटी परिषदेत केडीएमसीच्या जैव विविधता उद्यानाला मानाचे स्थान

कल्याण डोंबिवली दि.७ ऑगस्ट :

कोवीड काळात केलेल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकावणाऱ्या कल्याण डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या राष्ट्रीय शहरी जैव विविधता परिषदेमध्ये (National Conference on Urban BioDiversity Conservation) केडीएमसीच्या आंबिवली येथील जैव विविधता उद्यानाला मानाचे स्थान मिळाल्याचे दिसून आले. केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली आणि महापालिका सचिव संजय जाधव या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेला उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रिंगरोडमुळे सुमारे 1 हजार 200 झाडे बाधित होत आहेत. त्याबदल्यात महानगरपालिकेने एमएमआरडीए (MMRDA) च्या सहकार्याने कल्याण टिटवाळा मार्गावरील आंबिवलीच्या 40 एकर परिसरात तब्बल 15 हजार वृक्षांची लागवड करण्याचे ठरविले. आणि या वृक्ष लागवड मोहीमेला जुलै 2018 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर, एमएमआरडीए आणि वनविभागाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. वन विभागाने आंबिवली येथील टेकडी परिसरात महापालिकेला वृक्ष लागवडीसाठी दिलेल्या जागेवर आतापर्यंत करंजा, बहावा, जांभुळ, बदाम आंबे, निलगिरी, गुलमोहर, पिंपळ, कडुलिंब, बकुळ, फणस,अर्जुन, कदंब, कैलास पती, वड ,उंबर अशा विविध प्रकारच्या भारतीय आणि दुर्मिळ झाडांनी आता आंबिवलीची टेकडी हिरवीगार झाली आहे.

तसेच आय नेचर फाऊंडेशनच्या सहकार्याने फुलपाखरू उद्यान,बी पार्क, बॅट पार्क, पक्षी पार्क , नक्षत्र उद्यान , मेडिसीनल पार्कची निर्मिती करण्यात आली. ज्यामुळे या जैव विविधता उद्यानामध्ये 36 प्रकारचे पक्षी, 7 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 35 प्रकारचे कीटक आणि 4 प्रकारचे सस्तन प्राणी आढळून आले आहेत.

केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून, महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे वृक्ष अधिकारी संजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अत्यंत सुंदर पद्धतीने आकारला आलेल्या या जैवविविधता उद्यानाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.

मध्य प्रदेशातील इंदोर येथे जैवविविधता जतन या विषयावर संपन्न झालेल्या पहिल्याच राष्ट्रीय परिषदेमध्ये या जैवविविधता उद्यानाबाबत शहर अभियंता सपना कोळी देवलपल्ली यांच्या सादरीकरणाची दखल परिषदेत घेण्यात आली. त्यासोबतच या जैवविविधता उद्यानाबाबतचा लेखही या परिषदेत प्रकाशित करण्यात आला.

कधी काळी आपल्या नकारात्मक कामासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या केडीएमसी आणि तिच्या प्रशासनामध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी निर्माण केलेल्या नव्या सकारात्मकतेची, विश्वासाचीच ही पोच पावती आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा