Home ठळक बातम्या भाषेतून केवळ विचारच नाही तर आपली संस्कृतीही झिरपते – लेखिका दिपाली केळकर

भाषेतून केवळ विचारच नाही तर आपली संस्कृतीही झिरपते – लेखिका दिपाली केळकर

 

डोंबिवली दि.14 फेब्रुवारी :
भारतीय कलेचे सूत्र आहे की जे जे सुंदर आहे ते ते वेचावे आणि सुंदर ते मांडावे. आपल्या मराठी भाषेत आपण वाईट गोष्टींसाठीही खूप चांगले शब्द वापरतो. कारण भाषेतून आपण केवळ विचार नाहीत तर आपली संस्कृतीही झिरपत असते असे मत सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका आणि लेखिका दिपाली केळकर यांनी व्यक्त केले. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि साहित्ययात्रा संस्थेतर्फे डोंबिवलीच्या के.बी.वीरा शाळेच्या मैदानात आयोजित ग्रंथोत्सवात ‘स्त्रीधन’ या विषयावर त्या बोलत होत्या. ‘स्त्रीधन’ संकल्पनेद्वारे त्यांनी पूर्वीच्या काळातील स्त्रियांच्या कलाविष्काराचा, साहित्याचा अत्यंत सुंदर असा मागोवा घेतला.

पूर्वीच्या काळी स्त्रियांचे जग हे चार भिंतीआड होते. त्या काळातील स्त्रिया आयुष्यभर लॉकडाऊनमध्येच वावरायच्या. आणि त्यातूनच मग स्वतःला व्यक्त करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या ओव्या आणि उखण्यांचा जन्म झाला. मात्र कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेली, लिहिता वाचता न येणाऱ्या स्त्रीचा आत्मस्वर हा पहिल्यांदा ओव्या, उखाण्यांतून उमटल्याचे दिपाली केळकर यांनी सउदाहरण सांगितले. तर विनोद हा स्त्रियांकडे पूर्वीपासूनच होता, आद्यविनोदी काव्य हे स्त्रीनेच रचल्याचे कवियत्री इंदिरा संत यांनी म्हटले आहे. तर बहिणाबाईंसह त्या काळातील स्त्रियांनी रचलेल्या ओव्या म्हणजे एकप्रकारे मॅरेज कौन्सिलिंगच. संसार हा कडूच आहे पण आपल्या स्वभावाने आणि आपल्या गुणाने तो कसा गोड करता येईल हाच या ओव्यांचा मतितार्थ आहे. तर त्या काळातील स्त्रिया ओव्यांच्या माध्यमातून जात्यापाशी ( हाताने तांदूळ दळण्याचे दगडी साधन) बोलून मोकळ्या व्हायच्या, म्हणूनच त्यांना कोणत्याही मानसोपचारतज्ञाची गरज भासत नव्हती असेही केळकर यांनी यावेळी सांगितले.

कोणतेही शिक्षण घेतलेलं नसताना पूर्वीच्या स्त्रियांकडे निर्भीडपणा होता. जो आपल्या ओव्या उखण्यांच्या माध्यमातून परखडपणे मांडायच्या. मात्र आज आपण शिकलेल्या असूनही निर्भीड नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर ओव्यांचे प्रकार, उखण्यांचे प्रकार, त्यांची मांडणी, त्यांचे वेगळेपण, त्या काळातील स्त्रियांची प्रतिभशक्ती, प्रतिभा संपन्नता आदींवर सखोलपणे प्रकाश टाकला. तसेच पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारचे हुमाण म्हणजे कोडी घालून दीपाली केळकर यांनी कार्यक्रमात रंगत आणली. अचूक उत्तर देणाऱ्या श्रोत्यांना त्यांनी पुस्तके भेट दिली. सव्वातास सुंदररित्या रंगलेल्या या कार्यक्रमाच्या अखेरीस राष्ट्रीय महिला दिनाचे- म्हणजेच सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनाचे स्मरण केळकर यांनी केले.

 

ग्रंथ वाचन ही आपली परंपरा – डॉ. सच्चिदानंद शेवडे…
ग्रंथवाचन ही आपली परंपरा आहे. पुस्तकं म्हटल्यावर तिकडे आपण जाणं, पुस्तकं घेणं हा एक वेगळा आनंद असतो. जरी कितीही किंडल किंवा इतर तंत्रज्ञानाच्या आधारे वाचन केले. तरी पुस्तकं हातात घेऊन वाचणे हा एक आगळा वेगळा आनंद असल्याचे मत सुप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले. तर कोणीही पुस्तकाचे प्रदर्शन भरवले तरी आपण तिकडे जायला पाहीजे, आपली वहिवाट निर्माण केली पाहीजे. त्यामुळेच के.बी. वीरा हायस्कूलमध्ये आयोजित पुस्तक प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून पुस्तकं खरेदी करण्याचे आवाहनही डॉ. शेवडे यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा