डोंबिवली |२५ जून :
विविध प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेऊन दुर्गम, आदिवासी, ग्रामीण भागातील विद्यार्थी, नागरिकांसाठी शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबविणाऱ्या लोककल्प फाऊंडेशन तर्फे डहाणू तालुक्यातील तलासरी येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळ माध्यमिक विद्यालयास विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष डाॅ. किरण डी. ठाकूर यांच्या भविष्यवेधी संकल्पनेतून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात आला. (Lokkalp Foundation Launches Educational Initiative to Empower Students from Tribal Communities)
लोककल्प फाऊंडेशनच्या या उपक्रमांतर्गत छत्रपती शिक्षण मंडळ माध्यमिक विद्यालयाला ५ संगणक संच, १ प्रिंटर, १० ग्रीन बोर्ड देण्यात आले. या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, डिजिटल साक्षरता, तसेच आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आदिवासी दुर्गम भागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांनी झपाट्याने शैक्षणिक प्रगतीत पुढे जावे हा विचार करून तलासरी येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेची शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी लोककल्प फाऊंडेशनतर्फे निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला साहाय्यक विभागीय व्यवस्थापक चंदन पारायणे, मुख्य व्यवस्थापक स्वप्नील चिखलकर, सामाजिक दायित्व निधी साहाय्यक प्रसाद मळीक, कार्यालयीन साहाय्यक सुनील लांजेकर, कार्यालयीन लिपिक रोशन कोळी उपस्थित होते.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी लोककल्प फाऊंडेशन व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने छत्रपती शिक्षण मंडळ माध्यमिक विद्यालयास केलेल्या शैक्षणिक वस्तू साहाय्याबद्दल समाधान व्यक्त केले. या शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक प्रगतीत नक्कीच दमदार वाटचाल करतील, असा विश्वास मुख्याध्यापक पाटील यांनी व्यक्त केला. शाळेला हे शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यात सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ संघ स्वयंसेवक उदय कुलकर्णी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या शैक्षणिक साहित्य उपक्रमामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित या साधनांचा योग्य वापर करून आपली कौशल्ये, क्षमता विकसित करून शैक्षणिक प्रगतीत उत्तुंग भरारी घेऊन स्वता बरोबर आपले गाव, शाळेचे नाव उज्जवल करावे, अशी मनोगते उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केली.

