कल्याण दि.15 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल होत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील गळती सतत सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच या पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अवघ्या आठवड्याच्या आत आता या पक्षाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. (Major Blow to Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) in Kalyan-Dombivli; Former Mayor Ramesh Jadhav Joins Shiv Sena (Eknath Shinde Faction) with Supporters)
कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर तसेच उबाठा गटाचे कल्याण लोकसभा सह संपर्कप्रमुख रमेश जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काल रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाधव यांच्या प्रवेशाचे स्वागत करत आगामी राजकीय आणि सामाजिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने एकजुटीने आणि विकासाच्या ध्येयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. रमेश जाधव यांचा पक्षप्रवेश हा कल्याण डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडविणारा मानला जात आहे.
यावेळी शिवसेनेचे महेश गायकवाड, निलेश शिंदे, मल्लेश शेट्टी, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान कल्याण डोंबिवलीतील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेते – कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चढाओढ लागल्याचे दिसत आहे.

