Site icon LNN

काँग्रेसचे मोठे संघटनात्मक फेरबदल; कल्याणच्या अध्यक्षपदी नविन सिंग तर डोंबिवलीची जबाबदारी अमित म्हात्रेंवर

कल्याण आणि डोंबिवलीला पहिल्यांदाच मिळाले स्वतंत्र जिल्हाध्यक्ष

कल्याण डोंबिवली | २१ मे :
कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस संघटनेत मोठे आणि महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील संघटन अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. (Major Organizational Reshuffle in Congress; Naveen Singh Appointed Kalyan President, Amit Mhatre Given Charge of Dombivli)

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल राव यांनी यासंदर्भातील नविन जिल्हाध्यकांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये कल्याण शहर अध्यक्षपदी नविन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर डोंबिवली शहर काँग्रेसची धुरा अमित म्हात्रे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पक्षाशी दीर्घकाळ एकनिष्ठ राहून संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत असलेल्या जुन्या आणि अनुभवी पदाधिकाऱ्यांना या फेरबदलात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तर काँग्रेस पक्षाने या नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून आगामी काळात पक्ष अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे बोलले जात आहे.

आणखी जोमाने काम करून पक्षाचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार – अमित म्हात्रे (डोंबिवली जिल्हाध्यक्ष)…
पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून नवीन जबाबदारी दिली आहे, त्यामूळे येत्या काळात पक्ष संघटनेसाठी आपण अधिक जोमाने काम करणार असल्याची प्रतिक्रिया डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांनी या नियुक्तीनंतर व्यक्त केली आहे. तर पक्षातील सर्व मतभेद मिटवून सगळ्यांना एकत्र आणले जाईल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोचवण्याचा आपला प्रयत्न असेल. त्यासोबतच लोकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्याचाही आपण कायदेशीर मार्गाने प्रामाणिक प्रयत्न करणार करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कल्याणातील युवा पदाधिकारी – कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन पक्षवाढीसाठी काम करणार – नविन सिंग (कल्याण जिल्हाध्यक्ष)
कल्याण जिल्ह्यातील सर्व युवा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संघटनेत एकत्र घेऊन पक्षवाढीसाठी काम करण्यासह पक्षाच्या जुन्या आणि जाणत्या नाराज लोकांची भेट घेऊन त्यांना पुन्हा सक्रीय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया कल्याण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नविन सिंग यांनी व्यक्त केली आहे. तसेच कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आवाज उठवणार असल्याचे सांगत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेश उपाध्यक्ष ॲड. यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला १०० टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करू असेही नविन सिंग यांनी सांगितले.

Exit mobile version