Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप शुल्क माफ तर अग्निशमन दल शुल्क...

कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप शुल्क माफ तर अग्निशमन दल शुल्क निम्म्यावर

 

केडीएमसी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

कल्याण डोंबिवली दि. 3 ऑगस्ट :
अवघ्या काही आठवड्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असतानाच केडीएमसी प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना गुडन्यूज दिली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा तर अग्निशमन दल शुल्क निम्म्यावर आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी मुख्यालयात केडीएमसी प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या लोक प्रतिनिधींची बैठक झाली.

गेली 2 वर्षे कोवीडमुळे महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि मोठा सण असणाऱ्या गणेशोत्सवाला मोठा फटका बसला. परंतु यंदा मात्र कोवीड प्रादुर्भाव काही प्रमाणात असला तरी गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव विनानिर्बंध असल्याने नागरिकांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

त्यातच आता कल्याण डोंबिवलीतही मंडप शुल्क पूर्णपणे माफ करण्यासह अग्निशमन विभागाचे शुल्क पूर्वीपेक्षा 50 टक्के आकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. तसेच पावसाने उघडीप दिल्याने रस्त्यावरील खड्डेही भरण्याचे आदेश आपण संबंधित विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले. तर पीओपीच्या मूर्ती न वापरण्याचे आवाहन करत पुढील वर्षीपासून त्याविरोधातील कारवाई कडक केली जाईल अशी माहितीही आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली.

गणेशोत्सव मंडळांना पोलीस परवानगीही ऑनलाईन मिळणार – डीसीपी सचिन गुंजाळ
यंदाच्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक असणारी परवानगी यंदा ऑनलाईन मिळणार आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीजन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे कोणालाही पोलीस ठाण्यात यायची गरज भासणार नाही अशी माहितीही डीसीपी गुंजाळ यांनी दिली. तर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून केडीएमसीच्या स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची मदत घेण्यासह आणखीही कॅमेरे बसवण्यासाठी प्रशासनाला सांगण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला केडीएमसी आयुक्त, कल्याण डीसीपी यांच्यासह केडीएमसी प्रशासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा