Home क्राइम वॉच काळया जादुसाठी मांडूळाची 70 लाखांना विक्री: खडकपाडा पोलिसांकडून 5 जणांना बेड्या

काळया जादुसाठी मांडूळाची 70 लाखांना विक्री: खडकपाडा पोलिसांकडून 5 जणांना बेड्या

 

कल्याण दि.22 ऑगस्ट :
काळया जादूसाठी मांडूळाची विक्री करण्यासाठी आलेल्या 5 जणांना खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या मांडूळची किंमत अंदाजे 70 लाख रुपये असल्याची माहिती कल्याणचे एसीपी उमेश माने – पाटील यांनी दिली.

खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुर्मिळ प्रजातीचा हा सर्प विक्रीसाठी काही लोकं येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून निलेश हिलिम (व्यवसाय मजुरी आणि राहणार पालघर), चेतन कांबळे (भिवंडी), अरविंद पंडीत (टिटवाळा), विशाल ठाकरे (पालघर) आणि अनिल काटेला (पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मांडुळ ही सर्प प्रजातीतील एक दुर्मिळ प्रजाती आहे.

त्याचा वापर आयुर्वेदीक औषधासह काळया जादुसाठीही केला जात असल्याचा समज आहे. पोलिसांनी या पाच आरोपींकडून तब्बल 2 किलो 600 ग्रॅम वजनाच्या आणि 44 इंच लांबीचा मांडूळ हस्तगत केला आहे. सध्या या मांडूळाला वन विभाग आणि मानद वन्यजीव संरक्षक यांच्याकडे देण्यात आले असून लवकरच त्याची जंगलात सुटका केली जाणार असल्याचे एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले.

ही कारवाई कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील यांच्या निर्देशानुसार खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार केंचे, शरद झिने, पोलीस हवालदार पाटील, शेले, देवरे, कॉन्स्टेबल भालेराव, बोडके आणि तागडनेम यांच्या पथकाने केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा