Home ठळक बातम्या कल्याण लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने भाजपची मोर्चेबांधणी सुरू

कल्याण लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने भाजपची मोर्चेबांधणी सुरू

आमदार नरेंद्र पवार यांचा कल्याण लोकसभा क्षेत्राचा झंझावाती दौरा…”बूथ तिथे भाजप” हा कार्यकर्त्यांना दिला मंत्र…

कल्याण दि.10 ऑक्टोबर:

मागील लोकसभा निवडणूकीच्या वेळी शिवसेनेशी युती होती.त्यामुळे कल्याण लोकसभेची जागा ही शिवसेनेला सोडल्यामुळे येथून शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.मात्र आता परिस्थिती बदलली असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होणार की नाही याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.त्यामुळेच पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशाने आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण लोकसभा क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे ठरविले असून त्याच करीता संघटनात्मक प्रवास दौरे सुरू केले आहेत.

भाजप कल्याण लोकसभा प्रभारी आमदार नरेंद्र पवार यांनी लोकसभा क्षेत्राचे झंझावाती दौरे सुरू केले आहेत.नुकतीच त्यांची कल्याण लोकसभा प्रभारीपदी पक्षातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती झाल्यावर लगेचच आमदार नरेंद्र पवार यांनी स्वतःला कल्याण लोकसभा क्षेत्रात झोकून दिले आहे.मागील महिन्यात पक्षाचे केंद्रीय प्रभारी महेंद्र कुमार सिंग यांच्या उपस्थितीत लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पुढील कार्याची रचना करण्यात आली होती.

त्यानंतर आता आमदार पवार यांनी लोकसभा अंतर्गत असणाऱ्या विधानसभा क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. नुकताच आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या कळवा-मुंब्रा,कल्याण ग्रामीण,डोंबिवली,कल्याण पूर्व,उल्हासनगर,अंबरनाथ या सहाही मतदार संघांचा झंझावाती दौरा केला. या दोऱ्यात आमदार पवार यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेतल्या.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांचा अभ्यासवर्ग संपन्न झाला. यावेळी आमदार पवार यांनी प्रत्येक विभागातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. बूथ तिथे भाजपा हा मंत्र घेऊन सामान्य व्यक्तींना सर्व योजनांची माहिती देण्यापासून सरकारच्या कामाची माहितीही सांगणे हे आपले काम आहे. केवळ निवडणुका आल्या म्हणून सामान्यांना भेटणारे आपण नाही तर सामन्यांच्या भावना समजावून घेऊन त्या पद्धतीने काम करणे हे आपले ध्येय आहे असे मत उपस्थितन पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलताना आमदार पवार यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*