Home ठळक बातम्या ‘डोंबिवलीच्या बजबजपुरीला आमदार रविंद्र चव्हाण हेच जबाबदार’ ; डोंबिवली शिवसेनेचाही हल्लाबोल

‘डोंबिवलीच्या बजबजपुरीला आमदार रविंद्र चव्हाण हेच जबाबदार’ ; डोंबिवली शिवसेनेचाही हल्लाबोल

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा

डोंबिवली दि. २० सप्टेंबर :
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यापासून सुरुवात झालेल्या डोंबिवलीतील विकासकामां संदर्भातील शाब्दिक युद्ध काही थांबायचे नाव घेत नाहीये. यामध्ये आता डोंबिवली शहर शिवसेनेनेही उडी घेत थेटपणे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. डोंबिवलीच्या झालेल्या बजबजपुरीला केवळ आणि केवळ रविंद्र चव्हाण हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

डोंबिवली महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएकडून रस्त्यांचे काँक्रीटीकरण कामासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आपणच त्यासंदर्भात मुख्यमंत्री नसताना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून डोंबिवलीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डोंबिवलीच्या सद्यस्थितीवरती भाष्य करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

२००९ ते २०१४ या काळात केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार असतानाही तब्बल १ हजार ६०० कोटीचा निधी कल्याण डोंबिवलीला प्राप्त झाला होता. मात्र २०१४ पासून आतापर्यंत देशामध्ये यांचेच सरकार आहे. स्मार्ट सिटीचा निधी वगळता केंद्राकडून यांनी डोंबिवलीसाठी किती निधी आणला? असा प्रश्न सदानंद थरवळ यांनी यावेळी विचारला.
तर रविंद्र चव्हाण हे ज्या रस्त्यांच्या कामांवरून गेल्या काही दिवसांपासून बोलत आहेत. त्यासंदर्भात त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात किंवा गुवाहाटीला एकत्र असताना एकनाथ शिंदे यांना का विचारले नाही ? जर खरोखर हे रस्ते मंजूर झालेले आहेत तर रविंद्र चव्हाण यांनी त्याची कागदपत्रे सादर का करत नाहीयेत आदी सवाल करत आता त्यांनी केलेले हे भाष्य म्हणजे डोंबिवली करांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोपही सदानंद थरवळ यांनी यावेळी केला.

दरम्यान डोंबिवलीच्या विकासावरून सुरू झालेल्या या राजकारणाचे दररोज नवनविन अंक पाहायला मिळत आहेत. आज झालेल्या या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन करणारी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पुढचा अंक काय आणि कसा असेल याबाबत राजकीय तज्ञांमध्ये तर्क वितर्क लढवले जात आहेत.

या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहर प्रमूख विवेक खामकर , विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, महापालिका क्षेत्रप्रमूख वैशाली दरेकर,  कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंड, शहर संघटक मंगला सुळे,  किरणताई मोडकर, शहर कार्यालय प्रमुख सतीश मोडक, उपशहर प्रमूख अरविंद बिरमोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा