सर्वपक्षीय कार्यकर्ते – नागरिकांचा सहभाग; अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी
कल्याण | ११ ऑक्टोबर
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिकांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कल्याण – शीळ फाटा येथे जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरम्यान, वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात आला नाही तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा मनसे नेते राजू पाटील यांनी दिला. (MNS Launches Public Agitation Against Traffic Congestion on Kalyan–Shil Road; Leader Raju Patil Warns of Intensifying Protest if Issues Remain Unresolved)
कल्याण-शीळ रस्ता हा कल्याण, डोंबिवली, शीळफाटा आणि परिसरातील औद्योगिक व निवासी भागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या मार्गावर अवजड वाहनांची वाढती वर्दळ आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक कोंडीमुळे नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. अनेकदा प्रवासाचे नियोजन कोलमडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या परिस्थितीत अवजड वाहनांच्या वाहतुकीचे प्रभावी नियोजन करावे आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर राजू पाटील यांचे प्रश्नचिन्ह
या आंदोलनादरम्यान मनसे नेते राजू पाटील यांनी वाहतूक व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले. वाहतूक विभागातील काही अधिकारी आर्थिक व्यवहार करून अवजड वाहनांना मार्ग मोकळा करून देत असल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात आपल्याकडे व्हिडिओ पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून चौकशी होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या जनआंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल कामत, डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाऊ पाटील, सत्यवान म्हात्रे, अरुण जांभळे, यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि जबाबदार यंत्रणांवर नियंत्रण याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. आता मनसेच्या आंदोलनानंतर संबंधित प्रशासन आणि वाहतूक पोलीस विभाग कोणती पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

