Home ठळक बातम्या रेल्वे समांतर रस्त्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांची नागपूर अधिवेशनात लक्षवेधी

रेल्वे समांतर रस्त्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांची नागपूर अधिवेशनात लक्षवेधी

कल्याण ग्रामीण दि.28 डिसेंबर : 

गेल्या काही वर्षांपासून मुंब्रा दिवा डोंबिवली रस्त्याचा प्रस्ताव हा कागदावरच राहिला असून आता रस्त्याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मनसे आमदार राजू पाटील यांनी नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडत शासनाने या रस्त्याला मंजूरी देण्याची मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकीकरण सुरू असून एकीकडे लोकलमधील गर्दी आणि दुसरीकडे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी अशा दुहेरी कात्रीत नागरिक सापडतात. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीचे तत्कालीन आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी सर्वप्रथम रेल्वे समांतर रस्ता तयार करण्याची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या रस्त्यासाठी समर्थन दर्शवले होते अशी माहिती आमदार राजू पाटील यांनी यावेळी सभागृहात दिली. तसेच २००७ मधील एमएमआरडीएच्या बैठकीत या रस्त्याचा डीपीआर तयार करण्यासाठी ९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यानंतर पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी हा रस्ता रखडला होता.

मात्र गेल्या दीड दशकात कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सततच्या वाहतूक कोंडीने वाहन चालक हैराण झाल्याचेही आमदार पाटील म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन असलेल्या या रस्त्याच्या मंजुरीसाठी आपण निवेदनही दिले होते. परंतू अन्य रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन रेल्वे समांतर रस्ता मात्र अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगत या रस्त्याच्या कामासाठी शासनाने मंजुरी दिल्यास वाहतूक कोंडीवर मात करण्यात यश येणार असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.

डोंबिवलीकरांच्या प्रवासाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून पाऊण तासाच्या प्रवास अवघ्या पाच मिनिटांत होऊ शकणार असल्याने या रस्त्याला शासनाने तातडीने मंजुरी देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी हिवाळी अधिवेशनत केली आहे.

पूर परिस्थितीत काय करणार ? …

पावसाळ्यात मुसळधार पावसामध्ये कधी कधी रेल्वे सेवा बंद होते. त्याचप्रमाणे प्रस्तावित बुलेट ट्रेनदेखील बंद होण्याची भीती आहे. तर दिवा पश्चिमेला जाणारा पुलही पावसाळ्यात बंद होतो. त्यामुळे अशावेळी पर्यायी मार्गाची आवश्यकता असून पुर परिस्थितीत काय करणार ? असा सवाल आमदार राजू पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

अन्य रस्त्यांच्या कामांना मंजुरी, मात्र रेल्वे समांतर रस्ता दुर्लक्षित – आमदार राजू पाटील

मुंब्रा ते डोंबिवली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -०३ जुना आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ०८ जुना मार्गे काटई नाका कर्जत मार्गे खोपोली येथे पोहचणार आहे. तर शिळफाटा मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी मुंब्रा कौसा रस्ता आणि मोठा गाव डोंबिवली ते माणकोली राष्ट्रीय महामार्ग जोडरस्ता या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देखील देण्यात आली आहे. मात्र मुंब्रा ते डोंबिवली रेल्वेमार्गाला समांतर रस्त्याची मागणी करण्यात आली आहे. ज्या रस्त्याची मागणी करण्यात आली असून ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात देखील त्याचा समावेश आहे. मात्र या मार्गाला मंजुरी देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा