Site icon LNN

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली ही मुभा, म्हणून केडीएमसीमध्ये शिवसेना भाजपला पाठिंबा दिला – मनसेचे माजी आमदार राजू पाटील

नवी मुंबई दि.21 जानेवारी :
केडीएमसीमध्ये शिवसेना भाजपा महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबाबत अखेर मनसे नेते राजू पाटील यांची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीत स्थिरता राखण्यासाठीच मनसेने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थातून घेतलेला नाही, असे स्पष्ट मत माजी मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले आहे. (MNS Support to Shiv Sena–BJP in KDMC After Green Signal from Party Chief Raj Thackeray, Says Former MLA Raju Patil)

काही वेळापूर्वीच शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या या पाठिंब्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले होते. मनसे नेते राजू पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत माहिती दिली.

राजू पाटील म्हणाले की, “एकीकडे भाजपचे 50 तर शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत केडीएमसीत जो पळवा-पळवीचा खेळ सुरू होता, तो थांबताना आम्हाला दिसत नव्हता. भविष्यात इतर समिती किंवा महत्त्वाच्या टप्प्यांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे एक बाजू स्थिर राहावी, या हेतूनेच आम्ही शिवसेना भाजपला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला आहे.”

ते पुढे म्हणाले, “शिवसेना आणि भाजप यांना समर्थन देत आम्ही एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मनसेला काय मिळणार याची चर्चा करण्यापेक्षा सत्तेत असताना आमची कामे झाली की बस झाले, आम्हाला केवळ कामाशी देणेघेणे असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

युतीबाबत बोलताना राजू पाटील म्हणाले, “आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत निवडणूक लढलो, मात्र त्यांचे इथले काही नगरसेवक गायब झाले. या सर्व प्रकाराला केडीएमसीतील जनता आता कंटाळली आहे. अंबरनाथची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच हा निर्णय घेतला आहे. आणि हा निर्णय स्वतःच्या स्वार्थासाठी नसल्याचेही राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

तर मनसे अध्यक्षांच्या भूमिकेचा उल्लेख करत ते म्हणाले, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिले होते. त्या अधिकाराचा वापर करून परिस्थितीचा विचार करत हा निर्णय घेतला आहे.” तसेच “पाच नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही जनतेला न्याय देऊ शकतो का, हा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता, स्थिर प्रशासन आणि विकासासाठी योग्य तो निर्णय घेणे आवश्यक होते.” असेही मनसे नेते राजू पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version